स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने पटकावले 'वूमन्स टी२० चॅलेंजर्स'चे विजेतेपद

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

ट्रेलब्लेझर्सने महिला ट्‌वेंटी २० चॅलेंजरच्या निर्णायक लढतीत ११८ धावांचे यशस्वी संरक्षण करताना सुपरनोवाजला १६ धावांनी पराजित केले

दुबई-ट्रेलब्लेझर्सने महिला ट्‌वेंटी २० चॅलेंजरच्या निर्णायक लढतीत ११८ धावांचे यशस्वी संरक्षण करताना सुपरनोवाजला १६ धावांनी पराजित केले. स्पर्धेतील ही अखेरची २० षटके आहेत. पुन्हा कधी खेळायची संधी मिळेल, हे माहिती नाही. त्यामुळे सर्वस्व पणास लावण्याची ही वेळ आहे, असे स्मृतीने दोन डावांच्या ब्रेकमध्ये आपल्या खेळाडूंना सांगितले होते.

सुपरनोवाजची कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० धावांची खेळी केली; पण सलमा खातून (१८ धावात ३) आणि दीप्ती शर्मा (९ धावात २) यांनी सुपरनोवाजला लक्ष्यपासून दूर ठेवले. त्यापूर्वी राधा यादवने १६ धावांत निम्मा संघ बाद केला; पण स्मृती मानधनाच्या (६८) झुंजार अर्धशतकामुळे ८ बाद ११८ पर्यंत मजल मारता आली होती. 

या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सर्व खेळाडू एकत्र आलो होतो. मी बाद झाल्यामुळे आम्हाला भक्कम धावसंख्येपासून दूर राहावे लागले. खेळपट्टी फलंदाजीस साथ देणारी नसल्याने जम बसलेल्या फलंदाजाने अखेरपर्यंत उभे राहणे आवश्‍यक होते. हे मी करू शकले नाही, असे स्मृतीने सांगितले. 

आता आपण स्पर्धेतील अखेरची वीस षटके खेळणार आहोत. कोरोनामुळे पुन्हा मैदानात कधी उतरणार, हे माहिती नाही. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरीच आत्ता करायला हवी, असे आपण खेळाडूंना ब्रेकच्या वेळी सांगितले होते, असे स्मृतीने नमूद केले.

 स्मृती पुढे म्हणाली, या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती. आमच्याकडे चांगल्या फिरकी गोलंदाज होत्या. १३५ चे आम्ही ठरवलेले लक्ष्य साधले नसले, तरी ११८ ही आव्हानात्मक धावसंख्या होती. ते आव्हान आम्ही जास्त खडतर करण्यात यशस्वी ठरलो, असेही तिने सांगितले. 
 

संबंधित बातम्या