युवा फुटबॉल गुणवत्तेवर विश्वास

किशोर पेटकर
मंगळवार, 21 जुलै 2020

एफसी गोवा संघाचे विशीतील नवोदितांना प्राधान्य

पणजी

आगामी फुटबॉल मोसमासाठी खेळाडूंशी करार करताना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील लीग विनर्स शिल्ड विजेत्या एफसी गोवा संघाने युवा गुणवत्तेवर विश्वास दाखविला आहे. विशीतील खेळाडूंना करारबद्ध करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

एफसी गोवाच्या मुख्य संघासाठी निवडलेल्या खेळाडूंत मणिपुरी विंगर माकन विंकल चोथे हा आतापर्यंतचा सर्वांत तरुण खेळाडू आहे. या २० वर्षीय खेळाडूला त्यांनी २०२३ पर्यंत करारबद्ध केले आहे. बचावफळी बळकट करताना एफसी गोवाने युवा फुटबॉलपटूंवर भरवसा दाखविला आहे. लेफ्ट बॅक जागी निवडलेला सॅनसन परेरा २२ वर्षांचा आहेतो २०२२ पर्यंत संघाचा सदस्य असेल. राईट बॅक खेळाडू लिअँडर डिकुन्हाही २२ वर्षीय आहे. लिअँडर आणखी तीन वर्षे एफसी गोवा संघात राहील.

मेघालयाचा संघातील नवा खेळाडू रेडीम ट्लांग याच्याकडून एफसी गोवास मोठ्या अपेक्षा आहेत. विंगर असलेल्या रेडीमपाशी ३५ आयएसएल सामन्यांचा अनुभव असून तो २५ वर्षांचा आहे.

उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच एफसी गोवाने अनुभवी खेळाडूंवरही भर दिला आहे. स्पॅनिश एदू बेदिया आणि गोव्याचाच लेनी रॉड्रिग्ज यांना त्यांनी आणखी दोन वर्षांसाठी संघात कायम ठेवले आहे. एदू ३१तर लेनी ३३ वर्षांचा आहे. या दोघांचा दीर्घानुभव संघातील नवोदितांना मार्गदर्शक ठरेल.

संघाचे नवे स्पॅनिश प्रशिक्षक ३९ वर्षीय ह्वआन फेरॅन्डो यांच्यावर नव्या मोसमात मजबूत संघ बांधणीचे आव्हान असेल. त्यांना सहाय्यक प्रशिक्षक ३८ वर्षीय क्लिफर्ड मिरांडा यांच्याकडून मौलिक सहकार्य लाभेलक्लिफर्ड यांच्यापाशी भारतीय फुटबॉलचा दीर्घानुभव आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या