एफसी गोवा संघात वीस वर्षीय ‘विंगर’

किशोर पेटकर
शनिवार, 18 जुलै 2020

मणिपूरचा युवा फुटबॉलपटू माकन याच्याशी तीन वर्षांचा करार

पणजी

 एफसी गोवा संघाने मणिपूरचा वीस वर्षीय विंगर’ माकन विंकल चोथे याच्याशी तीन वर्षांचा करार केला आहे. गतमोसमात त्याने आय-लीग स्पर्धेतील पंजाब एफसी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

करारानुसार माकन २०२३ पर्यंत एफसी गोवा संघात असेल. ‘‘एफसी गोवा क्लबचा मी नियमित प्रशंसक आहे. आता मी या संघाची जर्सी घालण्यास सक्षम ठरलोय आणि देशातील खूप चांगल्या संघात असेन. ही स्वप्नपूर्तीच आहे,’’ अशी प्रतिक्रिया एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर माकन याने दिली. आपले राज्य मणिपूरमधील लोकांप्रमाणे गोव्यातील लोकही फुटबॉलवेडे आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा बहुमान असल्याचे तो म्हणाला.

एफसी गोवा संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी माकन याचे संघात स्वागत करतानातो त्याच्या वयातील खेळाडूंत सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्त केले. ‘‘दोन वर्षांपूर्वी एलिट लीग स्पर्धेत खेळताना त्याच्या शैलीने प्रभावित केले होते. त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त वीस वर्षांचा असला तरी त्याने आय-लीग विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले असून आशियाई स्पर्धेत खेळण्याचा अनुभवही त्याच्या गाठीशी आहे. चोथे देशातील उत्कृष्ट विंगर बनेल याचा आम्हाला विश्वास वाटतो,’’ असे रवी यांनी युवा खेळाडूविषयी सांगितले.

एफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध केलेला माकन हा दुसरा विंगर आहे. गोव्याच्या संघाने मेघालयाचा २५ वर्षीय रेडीम ट्लांग याच्याशी करार केला आहे.

चमकदार कारकीर्द

चपळ विंगर असलेल्या माकनची गुणवत्ता पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत बहरली. त्याने २०१८-१९ मोसमात मिनर्व्हा अकादमी संघाला एलिट लीग जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. २०१७-१८ मोसमात मिनर्व्हा पंजाब संघ आय-लीग विजेता ठरला. त्या मोसमात माकनने २७ जानेवारी २०१८ रोजी नेरोका एफसीविरुद्ध बदली खेळाडू या नात्याने आय-लीग स्पर्धेत पदार्पण केले. २०१८-१९ मोसमात त्याला संघाच्या मुख्य चमूत स्थान मिळाले. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी रियल काश्मीरविरुद्धच्या आय-लीग सामन्यात तो सुरवातीपासून खेळला. त्या मोसमात त्याने मिनर्व्हा संघाचे एएफसी कप स्पर्धेतील ५ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत तो पंजाब एफसीकडून १४ सामने खेळला व २ गोल नोंदविले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या