पेनल्टी गमावलेल्या सांतानाची कमाल

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

कोलकात्यातील संघाला चौथा पराभव पत्करावा लागला, मात्र स्पर्धेत अखेर गोल नोंदविल्याचे समाधान त्यांना लाभले.

पणजी: पेनल्टी फटका गमावलेल्या स्पॅनिश आरिदाने सांतानाच्या  एका मिनिटातील दोन गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने मंगळवारी पिछाडीवरून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ईस्ट बंगालला 3-2 फरकाने हरविले. कोलकात्यातील संघाला चौथा पराभव पत्करावा लागला, मात्र स्पर्धेत अखेर गोल नोंदविल्याचे समाधान त्यांना लाभले.

चुरशीचा ठरलेला सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. कोंगो देशाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर जॅक मघोमा याने ईस्ट बंगालला 26व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा तब्बल 385 मिनिटानंतर स्पर्धेतील पहिला गोल ठरला. मघोमा यानेच 81व्या मिनिटास ईस्ट बंगालची पिछाडी कमी केली. त्यापूर्वी 56व्या मिनिटास 39 सेकंदात स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांताना याने दोन गोल केले, तर 68व्या मिनिटास हालिचरण नरझारी याने हैदराबादची आघाडी भक्कम केली.

मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादचा हा पाच लढतीतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता नऊ गुण झाले आहेत. हैदराबाद संघ स्पर्धेत अपराजित असून अन्य तीन लढतीत बरोबरी नोंदविली आहे. ते आता पाचव्या स्थानी आले आहेत. मागील लढतीत जमशेदपूर एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखलेल्या ईस्ट बंगालचे चौथ्या पराभवामुळे पाच लढतीनंतर एक गुण आणि तळाचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

मॅटी स्टेनमन याच्या असिस्टवर मघोमा याने आयएसएल स्पर्धेत ईस्ट बंगालकडून गोल करणारा पहिला खेळाडू हा मान मिळविला. त्याचा डाव्या पायाचा फटका अचूक ठरला. त्यानंतर विश्रांतीपूर्वी ईस्ट बंगालच्या सेहनाज सिंग याने हैदराबादला महंमद यासीर याला गोलक्षेत्रात पाडले. रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर सांताना याने मारलेल्या फटक्याचा अचूक अंदाज बांधत ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने आपल्या उजव्या बाजूने अचूक झेपावत चेंडू अडविला.

विश्रानंतरच्या अकराव्या मिनिटास सेट पिसेसवर सांतानाचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे हैदराबादला बरोबरी साधता आली. महंमद यासीरच्या फ्रीकिकवर हैदराबादच्या कर्णधाराने अचूक नेम साधला. लगेच पंधरा सेकंदानंतर सांताना याने लिस्टन कुलासोच्या असिस्टवर पुन्हा गोलरक्षक मजुमदारचा बचाव भेदत हैदराबादला आघाडी मिळवून दिली. तासाभराच्या खेळानंतर अप्रतिम ड्रिबलिंगने ईस्ट बंगालच्या बचावपटूंना गुंगारा दिलेल्या बदली खेळाडू लिस्टन कुलासोच्या शानदार क्रॉस पासवर हालिचरण नरझारीने हैदराबादची आघाडी वाढविली. सामना संपण्यात नऊ मिनिटे बाकी असताना मघोमा याने ईस्ट बंगालची पिछाडी एका गोलने कमी करताना अँथनी पिल्किंग्टन याच्या फ्रीकिकवर मघोमाचे हेडिंग हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला रोखता आले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

  •  हैदराबादचा स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांतानाचे यंदा 4 गोल, आयएसएलमधील 18 लढतीत 13 गोल
  •  हैदराबादच्या हालिचरण नरझारीचे 64 आयएसएल लढतीत 3 गोल, यंदा पहिलाच
  •  ईस्ट बंगालचा कोंगो देशाचा आघाडीपटू जॅक मघोमा याचे आयएसएलमध्ये 2 गोल

संबंधित बातम्या