नॉर्थईस्ट युनायटेडने बंगळूरला रोखले

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

पोर्तुगीज विंगर लुईस माशादो याच्या दोन गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी माजी विजेत्या बंगळूर एफसीला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.

पणजी : पोर्तुगीज विंगर लुईस माशादो याच्या दोन गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी माजी विजेत्या बंगळूर एफसीला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

माशादोने सामन्याच्या चौथ्या मिनिटास गुवाहाटीच्या संघाला आघाडी मिळवून दिली. स्पॅनिश बचावपटू ज्युआनन याच्या गोलमुळे बंगळूरने 13व्या मिनिटास बरोबरी साधली. सुपर सब उदांता सिंगने 70व्या मिनिटास बंगळूरच्या खाती आघाडी जमा केली, मात्र प्रतिस्पर्ध्यांच्या बचावातील त्रुटीचा लाभ उठवत माशादोने 78व्या मिनिटास आणखी एक गोल केला.

जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने पाच लढतीत तिसरी बरोबरी नोंदविली. अन्य दोन विजयांसह त्यांचे आता नऊ गुण झाले आहेत. त्यांना मुंबई सिटीनंतर दुसरा क्रमांक मिळाला आहे. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर संघाला तिसऱ्या लढतीत बरोबरीचा एक गुण मिळाला. एका विजयासह त्यांचे चार लढतीतून सहा गुण झाले आहेत. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत. स्पर्धेत दोन्ही संघ अपराजित आहेत.

सामन्याच्या सुरवातीच्या तेरा मिनिटांत दोन गोल झाले. चौथ्याच मिनिटास नॉर्थईस्टच्या खाती आघाडी जमा झाली. पोर्तुगीज लुईस माशादोने हवेतून दिलेल्या चेंडूवर सुहेरने रोछार्झेला याला पास दिला. रोछार्झेला याने डाव्या पायाने मारलेल्या फटक्याने बंगळूरच्या ज्युआनन याच्या बूटचा वेध घेतला आणि नंतर चेंडू माशादो याला आपटून नेटमध्ये घुसला. यावेळी बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू पूर्णतः चकला.

गुवाहाटीच्या संघाचा आघाडी मिळविल्याचा आनंद नऊ मिनिटेच टिकला. बचावपटू ज्युआनन याच्या संधीसाधू गोलमुळे बंगळूरने बरोबरी साधली. यावेळी राहुल भेकेच्या थ्रोईनवर चेंडू नॉर्थईस्टच्या डायलन फॉक्सला आपटून ज्युआननकडे गेला. यावेळी स्पॅनिश खेळाडूने चेंडूला नेटची दिशा दाखविताना प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदला.

सामना संपण्यास वीस मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू उदांता सिंगने बंगळूरला आघाडी मिळवून दिली. उदांताने सुनील छेत्रीच्या असिस्टवर गोल केला. गोल करण्यापूर्वी सात मिनिटे अगोदर उदांता मैदानात उतरला होता. बंगळूरने आघाडी घेण्यापूर्वी नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याने प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न उधळून लावले होते, मात्र उदांताने त्याचा बचाव भेदला. मात्र बंगळूरची आघाडी आठ मिनिटेच टिकली. माशादो याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवर नॉर्थईस्टला पुन्हा बरोबरी साधून दिली. यावेळी पोर्तुगीज आघाडीपटूने बंगळूरच्या बचावफळीकडून झालेल्या चुकीचा लाभ उठविला.

दृष्टिक्षेपात...

  • - बंगळूरच्या ज्युआनन याचे यंदा 2 गोल, आयएसएलमध्ये एकंदरीत 5 गोल
  • - नॉर्थईस्ट युनायटेडच्या लुईस माशादो याचे आयएसएलमध्ये 2 गोल
  • - बंगळूरच्या उदांता सिंगचे आता आयएसएलमध्ये एकूण 8 गोल, यंदा पहिलाच
  • - नॉर्थईस्ट युनायटेडचे यंदा सर्वाधिक 8 गोल
  • - सामन्यात बंगळूरचे 511, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 264 पास

संबंधित बातम्या