नॉर्थईस्टचे दोघे खेळाडू कोरोना बाधित; उर्वरित संघाचा सराव पुन्हा सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

गोव्यात जैवसुरक्षा वातावरणातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यास अवघे दिवस बाकी असताना सहभागी संघ नॉर्थईस्ट युनायटेडच्या दोघा सदस्यांना कोराना विषाणूची बाधा झाली आहे, पण या खेळाडूंची दुसऱ्या हॉटेलमध्ये निवासाची सोय करत सराव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने बुधवारी घेतला.

पणजी :  गोव्यात जैवसुरक्षा वातावरणातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यास अवघे दिवस बाकी असताना सहभागी संघ नॉर्थईस्ट युनायटेडच्या दोघा सदस्यांना कोराना विषाणूची बाधा झाली आहे, पण या खेळाडूंची दुसऱ्या हॉटेलमध्ये निवासाची सोय करत सराव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने बुधवारी घेतला.

जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मागील दोन दिवस सराव केलेला नाही. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस हा संघ कांदोळी येथील नियमित सराव मैदानावर दिसला नाही. चाचणीत बाधित आढळलेले दोन्ही खेळाडू लक्षणे नसलेले आहेत, असे नॉर्थईस्ट युनायटेड क्लबने बुधवारी संध्याकाळी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. दोन्ही खेळाडूंची वेगळी सोय केली असून ते आरोग्यदायी आणि तंदुरुस्त असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. इतर स्टाफ व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह असून बुधवारपासून संघाने सराव सुरू केला आणि संघ स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी सज्ज होत असल्याचे क्लबने स्पष्ट केले आहे.

आयएसएल स्पर्धेला शुक्रवारपासून (ता. २०) सुरवात होत असून नॉर्थईस्टचा स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी (ता. २१) मुंबई सिटी एफसीविरुद्ध वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. स्पर्धेतील सामने बांबोळी व फातोर्डा येथील रिकाम्या स्टेडियमवरही खेळले जातील.

उपलब्ध माहितीनुसार, गुवाहाटी येथील नॉर्थईस्ट युनायटेड संघ गेल्या शनिवारी हैदराबाद एफसीविरुद्ध सराव सामना खेळला, त्यात त्यांनी विजय नोंदविला. त्यापूर्वी त्यांचा जमशेदपूर एफसीविरुद्ध सराव सामना झाला होता. हे दोन्ही सामने नॉर्थईस्ट संघ नियमित सराव केंद्र असलेल्या कांदोळी येथील मैदानावर खेळला होता आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलपासून मैदान अगदी जवळ आहे. दोघे सदस्य चाचणीत कोविड बाधित आढळल्यामुळे स्पर्धा मार्गदर्शक शिष्टाचारानुसार सारा संघ तात्पुरत्या विलगीकरण प्रक्रियेत दाखल झाला आहे. पुन्हा जैवसुरक्षा वातावरणात येण्यासाठी संघ सदस्यांची दोन वेळा निगेटिव्ह चाचणी येणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील सारे संघ जैवसुरक्षा वातावरणात आहेत, त्यात मार्गदर्शक शिष्टाचाराचे कडक पालन होत असूनही चाचणीत बाधित सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गतमहिन्यात नॉर्थईस्ट युनायटेडच्या सहाय्यक प्रशिक्षकांना कोविड-१९ ची बाधा झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
 

संबंधित बातम्या