एफसी गोवाचा भर नामुष्की टाळण्यावर

एफसी गोवाचा भर नामुष्की टाळण्यावर
Unbeaten Jamshedpur Dangerous Team in the last six matches

पणजी: जमशेदपूर एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील सहा लढतीत अपराजित आहे. या धोकादायक संघाविरुद्ध खेळताना सलग दोन सामन्यातील पराजित एफसी गोवाचा भर आणखी एका पराभवाची नामुष्की टाळण्यावर असेल.

सामना बुधवारी (ता. 23) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. स्कॉटलंडचे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसीला पहिल्या लढतीत चेन्नईयीनकडून हार पत्करावी लागली. त्यानंतर या संघाने  चार बरोबरी व दोन विजयाची नोंद करत 10 गुणांची कमाई केली असून पाचव्या स्थानी आहे. स्टील सिटीतील संघाने सध्या अग्रस्थानी असलेल्या मुंबई सिटीस बरोबरीत रोखले, तर दुसऱ्या स्थानावरील एटीके मोहन बागानला पराभूत केले आहे. साहजिकच जमशेदपूरविरुद्ध खेळताना बुधवारी एफसी गोवाचा संघ दबावाखालीच असेल. जमशेदपूरच्या बचावफळीत पीटर हार्टली व स्टीफन इझे यांनी भक्कम खेळ केला आहे. टीपी रेहेनेश याचे गोलरक्षणही दक्ष आहे. निलंबन संपल्याने एतॉर मॉनरॉयही उपलब्ध असेल. त्यामुळे एफसी गोवाच्या आक्रमकांचा कस लागेल.

कमी कालावधीत जास्त सामने खेळलेल्या एफसी गोवास मागील दोन लढतीत अनुक्रमे एटीके मोहन बागान व चेन्नईयीन एफसीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दोन विजय, दोन बरोबरी व तीन पराभव या कामगिरीसह एफसी गोवाच्या खाती आठ गुण असून सध्या ते सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांचा हुकमी स्ट्रायकर इगोर आंगुलो याला मागील दोन लढतीत गोल नोंदविता आलेला नाही. तुलनेत जोर्ज ओर्तिझ आणि ब्रँडन फर्नांडिसने लक्षवेधक खेळ केला आहे.

जमशेदपूर संघही आक्रमक खेळ करतो, त्यांच्यापाशी हमखास गोल करणारा नेरियूस व्हॅल्सकिस आहे. त्यामुळे एफसी गोवाच्या बचावफळीस दक्ष राहावे लागेल. आतापर्यंत फक्त एकाच लढतीत एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाझ याने क्लीन शीट राखली आहे. सामन्याच्या अंतिम टप्प्यात पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवा संघ दोन सामन्यात पराभूत झाला आहे.

नव्या सामन्याची तयारी...

``आपला संघ व्यावसायिक आहे. मागील सामन्यातील निकाल खेदजनक होता, आम्ही काही चुका केल्या, पण तो पराभव विसरून आम्ही जमशेदपूरविरुद्धच्या लढतीसाठी तयारी केली आहे. मी व्यक्तिशः त्यांचे सामने पाहिले आहेत आणि त्यानुसार रणनीती तयार केली आहे. एफसी गोवा संघ सामन्यागणिक सुधारत आहे, सारे खेळाडूही तंदुरुस्त होत आहेत,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

``प्रत्येक सामन्यात खेळाडू मजबूत होत आहेत. काही बाबींवर लक्ष देणे आवश्यक असून तशा सूचना केल्या असून खेळाडूंनीही त्यास प्रतिसाद दिला आहे. अशा खेळाडूंच्या चमूसह तुम्ही चांगेल निकाल मिळवू शकता,`` असे आपल्या संघाची पाठ थोपटताना जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी सांगितले. एफसी गोवासारख्या चांगल्या संघाविरुद्ध आपल्या संघाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

  • - आयएसएलमध्ये एकमेकांविरुद्धच्या 6 लढतीत एफसी गोवाचे 3, जमशेदपूरचे 2 विजय, 1 बरोबरी
  • - आमनेसामने एफसी गोवाचे 11, तर जमशेदपूरचे 6 गोल
  • - यंदाच्या स्पर्धेत एफसी गोवाचे 8, जमशेदपूरचे 7 गोल
  • - एफसी गोवाचा इगोर आंगुलो आणि जमशेदपूरचा नेरियूस व्हॅल्सकिस यांचे समान 6 गोल
  • - गतमोसमात फातोर्डा येथे जमशेदपूर 1-0 फरकाने, तर जमशेदपूर येथे एफसी गोवा 5-0 फरकाने विजयी
     

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com