कोलकाता-राजस्थान सामना; आजच्या विजयानंतरही प्लेऑफची खात्री नाही

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

गुणतक्‍त्यात सध्या अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्याचे आव्हानही संपुष्टात येणार; परंतु जिंकणाऱ्या संघाला प्लेऑफची खात्रीही असणार नाही.

दुबई : गुणतक्‍त्यात सध्या अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्याचे आव्हानही संपुष्टात येणार; परंतु जिंकणाऱ्या संघाला प्लेऑफची खात्रीही असणार नाही. कारण इतर सामन्यांच्या निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

अशा जर-तरच्या परिस्थितीत कोणताही पुढचा-मागचा विचार न करता कोलकाता-राजस्थान संघांना विजयाबरोबर धावांची सरासरी वाढवण्यासाठी खेळावे लागणार आहे.  कोलकाताचे सलग दोन पराभव झाले आहेत; तर राजस्थानने सलग दोन विजय मिळवले आहेत. त्यांनी हे विजय मुंबई आणि पंजाबविरुद्ध मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. पर्यायाने त्यांचे पारडे फलंदाजी आणि गोलंदाजीतही वरचढ आहे. 

दोन्ही संघात निष्णांत खेळाडू आहेत; परंतु प्रामुख्याने कोलकाता संघात एकत्रित कामगिरीचा अभाव दिसून आला आहे. शुभमन गिल आणि नितीश राणा यांना पुरेशी साथ मधल्या फळीतील फलंदाजांची मिळत नाही. अधून मधून एखादा फलंदाज चमकतात ते सामने कोलकाताने जिंकलेले आहे. 

राजस्थानचा संघ मात्र चांगलाच फॉर्मात आलेला आहे. बेन स्टोक्‍स कमालीची फलंदाजी करत आहे. संजू सॅमसन आणि स्टीव स्मिथ हेसुद्धा मॅचविनर आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी आपली ही क्षमता सिद्ध केली आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचे चक्रव्यूह भेदणे कोलकात्याच्या फलंदाजांना सोपे जाणार नाही. परिणामी या सामन्यात राजस्थानचा संघ एक पाऊल पुढे आहे.  

संबंधित बातम्या