‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत डिचोलीत फडकला तिरंगा

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत राष्ट्रीय दिनी भारतीय तिरंगा फडकावण्याचा संकल्प सम्राट क्‍लब इंटरनॅशनलने केला आहे.

डिचोली: देशाबद्दल स्वाभिमान जागृत व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रध्वज फडकावणे, हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. याच उद्देशाने ‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत राष्ट्रीय दिनी भारतीय तिरंगा फडकावण्याचा संकल्प सम्राट क्‍लब इंटरनॅशनलने केला आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी डिचोलीतून या संकल्पनेला मूर्तस्वरूप आले असून सम्राट क्‍लबचे जवळपास 50 सदस्यांनी आपल्या घरासमोर ध्वजारोहण करून भारतीय तिरंगा फडकविला आहे. ध्वजारोहण करताना भारतीय तिरंग्याचा सन्मान राखण्याकडे सम्राट क्‍लबच्या सदस्यांनी विशेष लक्ष दिले, अशी माहिती सम्राट क्‍लब इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद शिंक्रे यांनी डिचोलीत पत्रकार परिषदेत दिली. 

Tractor Parade: लाल किल्ल्यावर फडकला शेतकरी आंदोलनाचा ध्वज -

सम्राट क्‍लबतर्फे दरवर्षी 9 ते 15 ऑगस्ट या काळात ‘देश प्रथम’ सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आजर्यंत शैक्षणिक संस्था आणि सरकारी पातळीवर ध्वजारोहण आणि विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय दिन उत्साहात साजरे करण्यात येतात. मात्र, भारतीय तिरंगा सगळ्यांच्या नजरेसमोर असावा, देशाबद्दलचे प्रेम आणि देशाभिमान जागृत व्हावा तसेच राष्ट्रीय दिनाचे महत्व कळावे, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर वा आपल्या वसाहतीत ध्वजारोहण करणे हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. डिचोलीतीतून प्रारंभ होणाऱ्या या संकल्पापासून प्रत्येकजण प्रेरणा घेवून भविष्यात या संकल्पनेला व्यापक स्वरूप प्राप्त होणार असल्याचा विश्वासही गुरुप्रसाद शिंक्रे यांनी व्यक्‍त केला. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरादाराकडे पाठ करून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानापासून प्रत्येकाने प्रेरणा घेवून सम्राट क्‍लबच्या संकल्पनेचे भविष्यात अनुकरण करून आपल्या देशाबद्दलचा आपला स्वाभिमान प्रकट करावा, असे आवाहनही गुरुप्रसाद शिंक्रे यांनी केले. 

गोमंतकीयांच्या दारी दंतचिकित्सकांची गाडी -

या पत्रकार परिषदेवेळी क्‍लबचे राज्य विस्तार विभाग अध्यक्ष दिवाकर शिंक्रे, क्‍लबचे मावळते राज्य अध्यक्ष प्रसाद नाईक, डिचोली सम्राट क्‍लबचे अध्यक्ष गुरुदास कोरगावकर, सचिव गोपाळ मोरजकर, खजिनदार शिवशंकर जिरगे, कार्यक्रम प्रमुख यदुनाथ शिरोडकर, शेखर नाईक, शिवदास कवठणकर, बाळकृष्ण वेर्णेकर, सत्यवान नाईक, श्रीधर मयेकर, भगवान हरमलकर आणि हनुमंतप्पा रेड्डी उपस्थित होते.  26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी डिचोलीत जवळपास 50  आपल्या घरासमोर तिरंगा फडकविला आहेत, अशी माहिती प्रसाद नाईक यांनी दिली. तर हा संकल्प यशस्वी होण्यासाठी काल सोमवारी सायंकाळी डिचोलीत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यदुनाथ शिरोडकर यांनी दिली.

संबंधित बातम्या