अमेरिकन ओपन टेनिस: अँडी मरेची शर्थ, सेरेना विल्यम्सचा सहज विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीच्या संकटातून मार्ग काढत सुरू होणाऱ्या पहिल्या ग्रॅंड स्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अँडी मरेला सलामीलाच कडवा प्रतिकार चाखावा लागला.

न्यूयॉर्क: कोरोना महामारीच्या संकटातून मार्ग काढत सुरू होणाऱ्या पहिल्या ग्रॅंड स्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अँडी मरेला सलामीलाच कडवा प्रतिकार चाखावा लागला. दुसरीकडे २४ व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेना विल्यम्सने मात्र एकतर्फी विजयाची नोंद केली.

३३ वर्षीय ब्रिटनचा अँडी मरे २०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर खेळलेला नाही, या यूएस ओपनच्या सलामीला त्याने पहिले दोन सेट गमावल्यानंतर जपानच्या योशिहितो निशिओकाचा ४-६ ४-६ ७-६ (७-५) ७-६ (७-४) ६-४ असा पराभव केला. या विजयासाठी मरेला चार तास ३९ मिनिटे शर्थ करावी लागली. मरेची दुसऱ्या फेरीत लढत १५ व्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्‍स उगर-अलिस्मिनविरुद्ध होईल.
मरेप्रमाणे ब्रिनटनचा रहिवाशी असलेल्या ७६ व्या मानांकित कॅमेरून नोरीने मरेप्रमाणे पहिले दोन सेट गमावल्यावर नवव्या मानांकित अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वेत्झर्मानवर ३-६, ४-६, ६-२, ६-१, ७-५ अशी मात केली. 

महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला मात्र पहिल्या फेरीतील विजयासाठी फारशी शर्थ करावी लागली नाही, तिने क्रिस्टी ॲन्‌चा ७-५, ६-३ असा पराभव केला. सेरेनाला अमेरिकन ओपनमधील हा १०२ वा विजय आहे, तिने एकाच स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवण्याचा ख्रिस एव्हर्टचा विक्रम मोडला. पहिल्या फेरीचा हा विजय मिळवताना सेरेनाने १३ बिनतोड सर्व्हिस केल्या.

संबंधित बातम्या