यूएस ओपन: नोवाक जोकोविच, पेत्रा क्विटोवा उपउपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

दिग्गज टेनिसस्टार नोवाक जोकोविच आणि पेत्रा क्विटोवा यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील आपली वाटचाल कायम ठेवली. शानदार विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोघांनीही सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

न्यूयॉर्क: दिग्गज टेनिसस्टार नोवाक जोकोविच आणि पेत्रा क्विटोवा यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील आपली वाटचाल कायम ठेवली. शानदार विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोघांनीही सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

फेडरर आणि नदाल यांच्या अनुपस्थितीत विजेतेपदाचे प्रमुख दावेदार नसलेल्या जोकोविचने २८ व्या मानांकित जान लेनार्डचा  ६-३, ६-३, ६-१ असा पराभव केला. या विजयासाठी जोकोविचला एक तास ४२ मिनिटे कोर्टवर राहावे लागले.

या विजयामुळे माझ्या आत्मविश्‍वासात चांगलीच वाढ झाली आहे. मला त्याच्या सर्व्हचा चांगला अंदाज येत होता. पहिल्या सेटनंतर माझा खेळ उंचावत गेला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये अधिक लय मिळाली होती. असे अव्वल मानांकित जोकोविचने सामन्यानंतर सांगितले.

गेल्या दोन आठवड्यांपासून माझा खेळ लयबद्ध होत आहे. सरावही चांगला केलेला आहे. अचूकतेवर भर आहे. कामगिरी उंचावण्याची इच्छा आणि ध्येयापर्यंत जाण्याची जिद्द तसेच आत्मविश्‍वास हे योग्य मार्गावर आहे. सध्या तरी मी एकेका सामन्याचा विचार करत आहे, असेही जोकोविच म्हणाला. जोकोविचचा पुढच्या फेरीत सामना २० व्या मानांकित पाल्बो कॅरेनेनो बुस्ता याच्याविरुद्ध होणार आहे, त्याने रिकॉर्डस बेर्नाकिसचा ६-४, ६-३, ६-२ असा पराभव केला.

महिलांमध्ये सहाव्या मानांकित क्विटोवाने जेसिका पेग्लुआवर ६-४, ६-३ अशी मात केली. दोन सेटमध्ये निकाल लागला असला, तरी लढत रंगतदार होती. आम्ही चांगला खेळ केला, असे सांगणाऱ्या क्विटोवाचा पुढील सामन्यात शेल्बे रॉजर्सशी होईल.

बोपण्णा दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत
भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णाने त्याचा कॅनेडाचा सहकारी डेनिस शापोलोवसह पुरुषांच्या दुहेरीची दुसरी फेरी गाठली. सलामीच्या सामन्यात त्यांनी अमेरिकेच्या एर्नेस्टो एस्कोबेदो आणि नोह रुबिन यांचा ६-२, ६-४ असा पराभव केला. हा सामना एक तास २२ मिनिटे चालला. 

दुसऱ्या फेरीत मात्र बोपण्णा-शापोलोव यांना तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागणार आहे.

 सहाव्या मानांकित केविन क्रावित्झ आणि अँड्रिस मेस हे त्यांचे प्रतिस्पर्धी असतील, सुमीत नागल आणि दिविज शरन यांचा पराभव झाल्यानंतर बोपण्णा हा एकमेव भारतीय आता स्पर्धेत लढत आहे.

 

संबंधित बातम्या