यूएस ओपन टेनिस: सेरेना विल्यम्सची स्लोआने स्टिफेन्सवर सरशी

वार्ताहर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

दोन माजी विजेत्यांमध्ये झालेली काँटे की टक्कर अनुभवी सेरेना विल्यम्सने जिंकली आणि तिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

वॉशिग्टन: दोन माजी विजेत्यांमध्ये झालेली काँटे की टक्कर अनुभवी सेरेना विल्यम्सने जिंकली आणि तिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सामन्यात सेरेना विल्यम्सने अमेरिकेच्याच स्लोआने स्टिफेन्सचा २-६, ६-२, ६-२ असा पराभव केला.

दोन माजी विजेत्यांमध्ये होणाऱ्या या सामन्याकडे ‘क्‍लॅश ऑफ चॅम्पियन्स’ म्हणूनही पाहिले जात होते.

महिलांमध्ये सर्वाधिक २४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेनाला हा सामना जिंकण्यासाठी एक तास ४३ मिनिटे लढावे लागले. या दरम्यान तिने १२ बिनतोड सर्व्हिस करून आपल्या ताकदवर खेळाचा ठसा उमटवला.

ही लढत फारच कडवी होती, असे मी म्हणेन, आमच्यामध्ये काही सामने फारच चुरशीचे झाले आहेत. स्टिफेन्सविरुद्ध खेळताना माझा सर्वोत्तम खेळ नेहमीच समोर आलेला आहे, एवढेच नव्हे तर तंदुरुस्तीही पणास लागलेली आहे, असे सेरेनाने सामन्यानंतर सांगितले. पहिला सेट गमावल्यावर मी शांत राहिले, आत्मविश्‍वास ढळू दिला नाही, प्रयत्न करत राहायला हवे, असे मी स्वतःला बजावत होते आणि शेवटी मला लय सापडली, असेही सेरेना म्हणाली.

विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी आहे, याबाबत विचारले असता सेरेना म्हणाली, सध्या तरी मी या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या तरी मी कोणत्याही विक्रमाचा विचार करत नाही. २३ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांपैकी सहा विजेतेपद तिने अमेरिकन ओपनची मिळवलेली आहेत.

संबंधित बातम्या