यूएस ओपन टेनिस: ‘सुपर मॉम’ची विक्रमी ग्रॅंड स्लॅम

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

आई असलेल्या सेरेना, अझारेंका, प्रिओंकोवा उपांत्यपूर्व फेरीत

न्यूयॉर्क: कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेली अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा मदर ऑफ ऑल ग्रॅंड स्लॅम ठरली. टेनिसविश्‍वात सुपर मॉम म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सेरेना, अझारेंका आणि प्रिन्कोवा यांनी अमेरिकन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तीन माता उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला. 

या अमेरिकन ओपनमध्ये सर्वाधिक विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी असलेल्या सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये ऑलिंपिया नावाच्या मुलीला जन्म दिला. याच वर्षी अझारेंका लिओ नावाचा मुलगा झाला; तर २०१८ मध्ये प्रिऑन्कोवा माता झाली. अशा टेनिसमध्ये सुपरमॉम समजल्या जाणाऱ्या आईंनी कोर्टवरची आपली कमाल कायम ठेवली आहे.

सेरेनाने सोमवारी झालेल्या सामन्यात १५ व्या मानांकित मारिया साक्कारीचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरा सेट टायब्रेकरवर जिंकून आव्हान कायम ठेवणाऱ्या सेरेनाला या विजयासाठी अडीच तास लढा द्यावा लागला. आर्थर ॲश स्टेडियमवरचा सेरेनाचा हा १०० वा विजय ठरला. अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरली; तसेच ५३ व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 

जैव सुरक्षेच्या नियमांच्या चौकटीत ही स्पर्धा होत असल्याने प्रिओंकोवा दोन आठवड्यापासून आपल्या मुलापासून दूर आहे. तिने चौथ्या फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या अलिझे कॉर्नेटवर ६-४, ६-७, ६-३ अशी मात केली. प्रिओंकोवा अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच दाखल झाली आहे. २०१७ च्या विम्बल्डन स्पर्धेनंतर ती प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळत आहे. उपांत्यपूर्व फेरीत सेरेना आणि प्रिओंकोवा यांचा सामना होणार आहे.

चौथ्या फेरीच्या सामन्यासाठी प्रिओंकोवाच्या मुलाला आणण्यात आले होते. विजयी फटका मारल्यानंतर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून मी त्याला पाहिलेही नाही. प्रत्येक दिवस कठीण होत होता. माझा खेळ तो पाहत असणार याची मला जाणीव होती आणि आपली आई अशी कामगिरी करताना त्याला निश्‍चितच अभिमान वाटला असेल, असे भावनिक मत प्रिओंकोवाने व्यक्त केले.

अझारेंकाने २०१५ नंतर प्रथमच यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने २० व्या मानांकित चेकप्रजासत्ताकाच्या करोलिना मुचोवाचा ५-७, ६-१, ६-४ असा पराभव केला. हा सामनासुद्धा दोन तासांपेक्षा अधिक काळ चालला.
 

संबंधित बातम्या