ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची ‘थिम’ बदलणार?

वृत्तसेवा
रविवार, 13 सप्टेंबर 2020

ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमला आज जर्मनीच्या झ्वेरेवचे आव्हान

न्यूयॉर्क:  तीन तिघाडा काम बिघाडा झाल्यानंतर आता चौथ्या वेळेस आपल्या पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी ऑस्ट्रियाचा डॉमनिक थिम नव्या उमेदीने तयार झाला आहे. अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्‍झॅंडर झ्वेरेवशी होणार आहे.

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांची माघार, तर जोकोविचवर स्पर्धेच्या मध्यावर करण्यात आलेली कारवाई यामुळे अमेरिकन स्पर्धेला रविवारी नवा विजेता मिळणार आहे. पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात थिमने रशियाच्या डॅनिली मेदवेदेवचा ६-२, ७-६, ७-६ असा पराभव केला; तर दुसऱ्या उपांत्य लढतीत झ्वेरेवने पहिल्या दोन सेटच्या पिछाडीनंतर स्पेनच्या पाब्लो बुस्टाचे आव्हान पाच सेटमध्ये ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ असे मोडून काढले.

ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवणे हे माझे सर्वात मोठे ध्येय आणि सर्वात मोठे स्वप्नही आहे, असे थिमने अंतिम फेरी निश्‍चित केल्यानंतर सांगितले. २०१८ मध्ये मी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळलो होतो. तेव्हा माझे पहिले स्वप्न पूर्ण झाले होते. २०१८ आणि २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत थिमला राफेल नदालकडून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यानंतर याच वर्षाच्या सुरुवातीस झालेल्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत थिमच्या हातून विजेतेपद निसटले होते. जोकोविचविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने चार तास कडवी लढत दिली होती. अशा प्रकारे थिमला तीनदा विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. 

ऑस्ट्रेलियात झालेला तो पराभव अजूनही पचनी पडत नाही. विजेतेपदाच्या मी फारच जवळ गेलो होतो. आता लगेचच मला दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची संधी मिळाली आहे, त्यासाठी मी स्वतःला सुदैवी समजतो, असे थिमने सांगितले. 

थिमचे झ्वेरेववर वर्चस्व
नदाल, फेडरर आणि जोकोविच प्रतिस्पर्धी नसल्यामुळे थिमला अधिक पसंती दिली जात आहे, शिवाय अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी असलेल्या झ्वेरेव याच्यावर त्याने वर्चस्व मिळवलेले आहे. या दोघांच्या लढतीत ७ः२ असा फरक आहे. 

नवा ग्रॅंड स्लॅम विजेता
नदाल-फेडरर-जोकोविच या ‘बिग थ्री’च्या वर्चस्वात उद्या २०१४ नंतर प्रथमच नवा ग्रॅंड स्लॅम विजेता मिळणार आहे. २०१४ मध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलीकने यू एस ओपन जिंकली होती. बीग थ्री व्यतिरिक्त तो नवा ग्रॅंड स्लॅम विजेता ठरला होता. आता २०१६ नंतर यू एस ओपनला नवा विजेता मिळणार आहे. त्या वर्षी स्वीत्झर्लंडचा स्टॅन वॉरविंका अजिंक्‍य ठरला होता.

संबंधित बातम्या