Goa Professional League : वेळसावने गार्डियन एंजलला नमविले

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्यांदा विजयाची चव चाखताना गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 1-0 फरकाने निसटते हरविले.

पणजी : वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्यांदा विजयाची चव चाखताना गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 1-0 फरकाने निसटते हरविले. सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यातील निर्णायक गोल 44 व्या मिनिटास सॅव्हेलॉन कार्दोझ याने नोंदविला. वेळसाव क्लबने आता आठ लढतीतून सात गुण झाले आहेत. स्पर्धेतील पाच पराभव आणि एका बरोबरीनंतर वेळसाव क्लबने सलग दुसरा सामना जिंकून पूर्ण तीन गुणांची कमाई केली. गार्डियन एंजलला स्पर्धेत चौथा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सात लढतीनंतर पाच गुण कायम राहिले.

विराट कोहलीची नव्या विक्रमाला गवसणी

गार्डियन एंजलला सामन्याच्या आठव्या  मिनिटास आघाडी घेण्याची संधी होती, परंतु जोव्हियल डायस चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. त्यानंतर ब्रायन मस्कारेन्हास याचे दोन प्रयत्न वाया गेल्यामुळे वेळसाव क्लबलाही गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. 21व्या मिनिटास रोहन रॉड्रिग्जचा फटका गार्डियन एंजलला गोलरक्षक राम सरूप याने अडविल्यामुळे वेळसाव क्लबला पुन्हा एकदा आघाडीपासून वंचित राहावे लागले. 

क्रिकेट संघाचा अजब विजय; 4 चेंडूत गाठले लक्ष्य 

विश्रांतीस एक मिनिट बाकी असताना अखेर वेळसाव क्लबने आघाडी प्राप्त केली. रोमारियो दा कॉस्ता याने रचलेल्या चालीवर रोहन रॉड्रिग्ज याने गार्डियन एंजलच्या बचावपटूस चकवून सॅव्हेलॉन कार्दोझच्या दिशेने चेंडू पास केला. यावेळी त्याचा फटका लेनी फर्नांडिसने रोखला, मात्र रिबाऊंडवर सॅव्हेलॉनने लक्ष्य साधले.

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर गार्डियन एंजल संघ बरोबरीच्या जवळ आला होता, पण बसंत सिंग याचा ताकदवान फटका वेळसाव क्लबच्या प्रेस्ली मस्कारेन्हास याने वेळीच रोखला. सामना संपण्यास नऊ मिनिटे असताना जोएल बार्रेटोचा फटका रोखताना वेळसाव क्लबचा गोलरक्षक प्रेस्ली मस्कारेन्हास गडबडला, पण ब्रायन मस्कारेन्हासने गोलरेषेवरून चेंडू परतावत संघाची आघाडी अबाधित राखली. 
 

संबंधित बातम्या