स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाची वेळसाव स्पोर्टस कल्चरल क्लबवर सहज मात

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाची वेळसाव स्पोर्टस कल्चरल क्लबवर सहज मात
Velsav Sports wins Goa football tournament

पणजी: गतवेळच्या संयुक्त विजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने रविवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गोलधडाका राखताना वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 4-0 फरकाने सहज मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्पोर्टिंगच्या एकतर्फी विजयात सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी दोन गोल झाले. फिलिप ओदोग्वू याने 11व्या, तर रोहित तोताड याने 31व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला पूर्वार्धात 2-0 आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर 58व्या मिनिटास मार्कुस मस्कारेन्हास याने, तर सच्चिदानंद साटेलकर याने 66व्या मिनिटास गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पोर्टिंग क्लबचे आता चार सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. वेळसाव क्लबची पिछाडी कायम राहिली. सहा सामन्यानंतर त्यांचा एक गुण कायम राहिला. सामना सुरू झाल्यानंतर अकराव्या मिनिटास मायरन फर्नांडिसच्या असिस्टवर ओदोग्वू याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. स्पोर्टिंगचा 20 वर्षांखालील खेळाडू रोहित याने मार्कुसच्या असिस्टवर वेळसाव क्लबच्या गोलरक्षकास चकविले. पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटास सच्चिदानंद याचा फटका वेळसावच्या गोलरक्षकाने अडविल्यामुळे स्पोर्टिंगची आघाडी दोन गोलपुरती मर्यादित राहिली.

मार्कुसने स्पोर्टिंगच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकल्यानंतर पूर्वार्धात संधी हुकलेल्या सच्चिदानंद याने मार्कुसच्या पासवर चौथ्या गोलची नोंद केली.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com