INDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ

INDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ
India and England

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात आली. आणि ही मालिका चांगलीच रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. पाच सामन्यांच्या या टी-ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियाने तीन सामने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेत बरेच चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडच्या संघाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामना भारताने जिंकला. यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पुन्हा विजय मिळवला होता. आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. याशिवाय पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने अफलातून कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी कोणता संघ मालिकेत वरचढ ठरणार याबाबत मत व्यक्त केले आहे. 

गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेसंदर्भात बोलताना, टी-ट्वेन्टी मालिकेत कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म परत येणे खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. शिवाय व्यंकटेश प्रसाद यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत बोलताना, विराट कोहिलीचा फॉर्म परत येण्याचा परिणाम आयपीएल पुरताच राहणार नसून, यावर्षीच्या उत्तरार्धात होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप मध्ये देखील होणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर, क्रिकेटमध्ये वाढत्या स्लेजिंगच्या प्रश्नावर बोलताना, खेळाडूंनी मर्यादेत राहून केलेले कोणतेही काम बरे राहणार असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले आहे. 

याशिवाय, भारतीय संघातील तीन विकेटकिपर यांच्याबाबत बोलताना यामुळे स्पर्धा वाढणार असल्याचे मत व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. भारतीय टी-ट्वेन्टी संघात सध्याच्या घडीला ऋषभ पंत, केएल राहुल आणि ईशान किशन हे तीन विकेटकिपर खेळाडू आहेत. त्यांच्याबाबत बोलताना व्यंकटेश प्रसाद यांनी ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच उत्तम विकेटकिपिंग करत असल्याचे सांगितले. तर केएल राहुल कोणत्या प्रकारची फलंदाजी करत आहे हे सर्वांनाच माहित असल्याचे ते पुढे म्हणत, तो लवकरच फॉर्म मध्ये परत येईल अशी अपेक्षा व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. यानंतर, ईशान किशन हा उत्तम फलंदाजी करत असून, तो क्षेत्ररक्षण देखील चांगली करत असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले. तसेच, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना उद्यापासून पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना शुक्रवारी 26 मार्च रोजी पुण्यातच खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा सामना देखील येथेच 28 मार्च रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते. त्यानंतर टी-ट्वेन्टी मालिका देखील टीम इंडियाने जिंकली असून, आता एकदिवसीय मालिकेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.                   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com