नॉर्थईस्ट युनायटेड, बंगळूर यांच्यासमोर विजयाचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील चांगल्या सुरवातीनंतर नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूर एफसी संघाची पत सध्या घसरली असून ती सावरणे आवश्यक आहे.

पणजी, ता. 11 (क्रीडा प्रतिनिधी) : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील चांगल्या सुरवातीनंतर नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूर एफसी संघाची पत सध्या घसरली असून ती सावरणे आवश्यक आहे. वास्को येथील टिळक मैदानावर खेळताना या दोन्ही संघांसमोर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल.

सामना मंगळवारी (ता. 12) खेळला जाईल. बंगळूरने नऊ सामन्यांतील खराब कामगिरीनंतर स्पॅनिश प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांना बदलून अंतिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्याकडे जबाबदारी सोपविली, पण मागील लढतीत त्यांना तळाच्या ईस्ट बंगालनेही हरविले. या संघाला स्पर्धेत प्रथमच सलग चार पराभवांची नामुष्की पत्करावी लागली. जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडची स्पर्धेतील सुरवात स्वप्नवत ठरली. पहिल्याच लढतीत त्यांनी मातब्बर मुंबई सिटीस हरविले. मात्र मागील सहा सामन्यांत त्यांना फक्त तीन बरोबरीमुळे तीन गुणांचीच कमाई करता आली. तीन सामने गमवावे लागले आणि तब्बल 11 गोल स्वीकारावे लागले.

बंगळूर एफसीचे 10 लढतीनंतर 12 गुण आहेत, तर तेवढेच सामने खेळलेल्या नॉर्थईस्टच्या खाती 11 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड संघ मंगळवारी प्रशिक्षक जेरार्ड नूस यांच्याविना मैदानात उतरेल. निलंबित असल्यामुळे गुवाहाटीच्या संघाला सहाय्यक प्रशिक्षक अलिसन खार्सिन्तिएव यांचे मार्गदर्शन लाभेल. ‘‘नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून आपला संघ सकारात्मक गोष्टींवर भर देईल. स्पर्धेचा दुसरा टप्पा आमच्यासाठी नवी सुरवात आहे. त्यामुळे संघ चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे खार्सिन्तिएव म्हणाले.

‘‘मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी संघ इच्छुक आहे. जिंकणे महत्त्वाचे आहे. मागील सामन्यात खेळाडूंनी माझ्यावर विश्वास दाखविण्यास सुरवात केली आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. त्याचा फायदा पुढील लढतीत होईल,’’ असा आशावाद बंगळूरचे प्रशिक्षक मूसा यांनी व्यक्त केला.

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात बंगळूर व नॉर्थईस्ट युनायटेडमध्ये 2-2 गोलबरोबरी

- यंदाच्या स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडच्या 3, तर बंगळूरच्या 2 क्लीन शीट

- बंगळूरचे सलग 4, तर नॉर्थईस्टचे सलग 2 पराभव

- स्पर्धेत बंगळूरचे 12 गोल, तर 13 गोल स्वीकारले

- नॉर्थईस्ट युनायटेडचे 12 गोल, त्यांच्यावर प्रतिस्पर्ध्यांचे 14 गेली.   

संबंधित बातम्या

फोटो फीचर