
IND vs NZ: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला. यावेळी त्याने युवा खेळाडूंशी चर्चा केली. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय संघाला या फॉरमॅटमध्येही ही गती कायम ठेवायची आहे.
धोनीने पहिल्यांदा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्याशी संवाद साधला. यानंतर युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला सल्ला देताना दिसला. धोनीला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पाहून आतापासूनच न्यूझीलंड संघात दहशतीचे वातावरण आहे.
बीसीसीआयने (BCCI) जारी केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी शुभमन गिल, फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि सपोर्ट स्टाफशी बोलतांनाही दिसत आहे. शुभमन गिल आणि ईशान भारताकडून डावाची सुरुवात करतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना उद्या संध्याकाळी 7.00 वाजता रांची येथे खेळवला जाईल.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारताच्या T20 संघाची पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक अव्वल खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. या संघाने अलीकडेच श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला होता.
नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे संघात नाहीत. अशा स्थितीत भारताची ताकद हार्दिक पांड्या, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि कुलदीप यादव या खेळाडूंवर अवलंबून असेल.
शुभमन गिल आणि ईशान भारताकडून डावाची सुरुवात करतील. शुभमन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये विशेष प्रभावशाली आहे. गेल्या चार डावांमध्ये त्याने तीन शतके झळकावली आहेत, ज्यात 208 धावांची खेळी आहे, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. पंजाबचा हा सलामीवीर टी-20 मध्येही आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमारला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, परंतु टी-20 मध्ये तो सर्वात धोकादायक फलंदाज ठरतो. त्याला एकदिवसीय सामन्यातील अपयशाची भरपाई टी-20 सामन्यांमध्ये करायची आहे.
भारताची फलंदाजी मजबूत दिसत असली तरी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दुखापतीतून पुनरागमन करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांना बर्याच काळानंतर एकत्र खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांच्यापैकी फक्त एकालाच टी-20 मध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या छोट्या फॉरमॅटमध्ये चहलला पसंती देण्यात आली असून अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत लेगस्पिनरच्या कामगिरीलाही खूप महत्त्व असेल.
एकदिवसीय मालिकेत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता, परंतु टी-20 मध्ये मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली किवी संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.