ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड: जगज्जेतेपदात विदितचा मोलाचा वाटा

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड: जगज्जेतेपदात विदितचा मोलाचा वाटा
Vidit Gujarathi's valuable contribution: Bags first-ever gold medal in Online Chess Olympiad

मुंबई: भारताच्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या संयुक्त विजेतेपदात संघातील सर्वांचा मोलाचा वाटा होता; पण कर्णधार विदित गुजरातीने कर्णधाराची आव्हानात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्याचा तसेच सहायक मार्गदर्शक श्रीनाथ यांचा या यशात मोलाचा वाटा होता, अशी भावना जागतिक विजेत्या संघातील खेळाडूंनी व्यक्त केली. 

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताने रशियासह संयुक्त विजेतेपद जिंकले. विदित कर्णधार असलेल्या या संघात तेरा जणांचा समावेश होता आणि सहा पटांवर लढत होणार होती. त्यामुळे योग्य संघनिवड मोलाची होती. विदित तसेच श्रीनाथ यांनी खेळाडूंच्या कौशल्याचा योग्य अभ्यास करून निवड केली. ते यशात मोलाचे ठरले. कर्णधार असल्याचे दडपण कमालीचे असते. ते असतानाही विदितने स्पर्धेत चांगली कामगिरी केली, याकडे लक्ष वेधले. 

भक्ती कुलकर्णीने सांगितले, सर्वांनी एकमेकांना छान साथ दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंगोलियाविरुद्धच्या लढतीत इंटरनेट खंडित झाल्यानंतर प्रत्येकाने काय करायला हवे, काय करायला नको, याबाबत विदित आणि श्रीनाथने साह्य केल्याचे तिने सांगितले. वंतिका अगरवालने कर्णधार आणि मार्गदर्शकांचा अनुभव, त्यांच्या सूचना खूपच मोलाच्या होत्या. त्यांनी आम्हाला मुक्तपणे खेळण्याची संधी दिली, असे सांगितले. 

हरिकाने काळे मोहरे असताना लढती जिंकल्याचा आम्हाला फायदा झाला, असे विदितने सांगितल्यावर आम्ही डावाच्या पूर्वतयारीबाबत विदित आणि श्रीनाथवर अवलंबून होतो, असे सांगितले; तर हरिकृष्णने विदितने कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. तो तसेच श्रीनाथ कितीही रात्र झाली, तरी मदतीस तयार असत, असे नमूद केले. 

जागतिक विजेतेपद विश्वनाथन आनंदसाठी आम्ही जिंकलो असे म्हणण्याऐवजी तो संघात असल्यामुळे जिंकू शकलो, असे म्हणणे जास्त उचित ठरेल. हे अविस्मरणीय यश त्याने आम्हाला मिळवून दिले आहे. त्याने असंख्य विजेतेपदे जिंकली आहेत. त्यात आमच्या सहकार्यामुळे एक छोटीशी तसेच मोलाची भर पडली, याचा आम्हाला अभिमान आहे. खेळाडूंची निवड करताना आम्ही प्रत्येकाचा विचार केला. त्यामुळे इराण संघाचा अभ्यास केल्यावर मी ब्रेक घेऊन आनंद आणि हरिकृष्णला पटावर उतरवण्याचे ठरवले. 
- विदित गुजराती, कर्णधार

संपादन: ओंकार जोशी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com