जीएफएच्या कडक कारवाईने सेझा अकादमी, वेळसाव संकटात

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

जीएफएने कोविड मार्गदर्शक शिष्टाचाराची अंमलबजावणी न केलेल्या संघांवर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सेझा फुटबॉल अकादमीस सहा गुणांना मुकावे लागेल.

पणजी: गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेसाठी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचाराचे उल्लंघन करणे सेझा फुटबॉल अकादमी आणि वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबला चांगलेच महागात पडले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएफएने कोविड मार्गदर्शक शिष्टाचाराची अंमलबजावणी न केलेल्या संघांवर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सेझा फुटबॉल अकादमीस सहा गुणांना मुकावे लागेल. या दंडात्मक कारवाईमुळे स्पर्धेतील फक्त एक सामना बाकी असलेल्या सेझा अकादमीवर स्पर्धेतून पदावनतीची टांगती तलवार आहे.

सूत्राने सांगितले, सेझा फुटबॉल अकादमी संघ 12 एप्रिल रोजी यूथ क्लब मनोरा, तर 15 एप्रिल रोजी पणजी फुटबॉलर्सविरुद्ध खेळला. सेझा अकादमीने कोविडविषयक विलगीकरण नियम न पाळल्याने प्राप्त केलेल्या एकूण सहा गुणांना मुकावे लागेल. सेझा अकादमीने मनोरा संघावर 3-2 फरकाने, तर पणजी फुटबॉलर्सवर 1-0 फरकाने मात केली होती. जीएफएच्या कारवाईमुळे सध्या 11 गुण असलेला सेझा अकादमी संघ पाच गुणांसह तळाच्या स्थानी येईल. प्रोफेशनल लीग स्पर्धेतील स्थान राखण्यासाठी शेवटच्या लढतीत त्यांना साळगावकर एफसीविरुद्ध विजय अत्यावश्यक असेल.

वेळसाव क्लबने सामन्यापूर्वी बंधनकारक असलेला सर्व खेळाडूंचा कोविड-19 चाचणी अहवाल जीएफएली सादर केला नव्हता, त्यामुळे 20 एप्रिल रोजी त्यांचा धेंपो स्पोर्टस क्लबविरुद्धचा सामना झाला नाही. नियमाचे पालन न केल्याबद्दल जीएफएने वेळसाव क्लबवर कारवाई करताना त्या लढतीत धेंपो क्लबला विजयाचे पूर्ण तीन गुण देण्याचे ठरवल्याचे सूत्राने सांगितले. या निर्णयाचा फायदा धेंपो क्लबला होणार असून ते 21 गुणांसह अव्वल स्थानी येतील. त्यांना स्पोर्टिंग क्लबवर एका गुणाची आघाडी मिळेल. वेळसाव क्लबचे आठ गुण आहेत.

तो सामना फेरपेनल्टीसह होणार

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत 13 एप्रिल रोजी साळगावकर एफसी व कळंगुट असोसिएशन यांच्यातील सामना 72व्या मिनिटानंतर गोलशून्य बरोबरीत स्थगित झाला होता. कळंगुटच्या कौमे ज्युनियर याने पेनल्टीवर गोल केल्यानंतर सामन्याच्या रेफरीने सहाय्यक रेफरीशी चर्चा करून कळंगुटच्या खेळाडूने नियमभंग केल्याचे ठरवून गोल अवैध ठरविला होता. त्यानंतर मैदानावर तणाव झाला, कळंगुटच्या खेळाडूंनी रेफरीशी हुज्जत घालून दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. आता तो पेनल्टी फटका पुन्हा घेत सामन्यातील बाकी वेळेतील खेळ पूर्ण करण्याचे जीएफएने ठरविले असल्याची माहिती सूत्राने दिली. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या साळगावकर संघासाठी त्या लढतीचा निकाल महत्त्वपूर्ण असेल.
 

AFC Champions League: एफसी गोवास आणखी एक संधी; परतीच्या लढतीत पर्सेपोलिस एफसीचे पारडे जड 

संबंधित बातम्या