विराट कोहलीची नव्या विक्रमाला गवसणी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

विराट एकदीवसीय क्रमवारीत पहिल्या आणि कसोटीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये पार पडलेल्या इंग्लंडविरुध्दच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताचे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडने  2-1 ने अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताला पराभव पत्कारावा लागला असला तरी कर्णधार विराट कोहलीचे चाहते सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र मागील दोन डावांमध्ये विराटने अर्धशतक ठोकत टीकाकारांची बोलती बंद केली आहे. या कामगिरीसोबतच विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

आयसीसीने नव्याने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या यादीत विराट पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचे या यादीत 744 गुण जमा झाले आहेत. विराट एकदीवसीय क्रमवारीत पहिल्या आणि कसोटीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच विराट क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात अव्वल पाच फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

INDvsENG : जोस बटलरच्या अर्धशतकीय खेळीमुळे पाहुण्या इंग्लंडचा टीम इंडियावर विजय 

तर दुसरीकडे इंग्लंडविरुध्दच्या टी-ट्वेन्टी मालिकेत दोनदा शून्यावर बाद झालेला भारताचा सलामीवीर के.एल.राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. टी-ट्वेन्टी मालिकेत राहुल चौथ्या क्रमवारीत आला आहे. या यादीमध्ये इंग्लंडचा वेगवान फलंदाज डेव्हीड मलानने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 894 गुण मिळाले आहेत. आरोन फिंच, बाबर आझम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; वानखेडे स्टेडियम होणार पर्यटनासाठी खुले  

भारताविरुध्दच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये नाबाद अर्धशतकी खेळी केलेला जोस बटलर या क्रमवारीमत 19 व्या स्थानी आला आहे. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 80 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर 11 व्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या