अबुधाबी : रॉयल चॅलेंजर बंगळूर संघाचीच नव्हे तर टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा असणाऱ्या आणि क्रिकेट विश्वात नावाजलेल्या विराट कोहलीचा संयम संघाचा पराभव समोर दिसत असताना ढळतो, हे बुधवारी झालेल्या मुंबई आणि बंगळूर सामन्यातून दिसून आले. कोहलीच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या सूर्यकुमार यादवला त्याने स्लेजिंग आणि खुन्नस देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाजमाध्यमावर तो फारच ट्रोल झाला.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई आणि बंगळूर यांच्यातला सामना दोघांसाठी महत्त्वाचा होता, विराटच्या संघाने १६४ धावा केल्यावर त्यांनी क्विन्टॉन डिकॉक, ईशान किशन असे मुंबईचे दोन खंदे फलंदाज बाद केल्यावर त्यांना विजयाचा मार्ग दिसू लागला होता, परंतु सूर्यकुमार यादवने संघाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत अतिशय देखणी फलंदाजी केली आणि सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला होता.
मॅन ऑन दि मिशन
राष्ट्रीय निवड समितीने आदल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली, त्यात आयपीएलमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सूर्यकुमारला वगळले होते. सूर्यकुमार दुखावला होता, परंतु त्याने त्याची जाणीव न होऊ देत आपल्या बॅटने उत्तर देण्यास सुरुवात केली आणि मॅन ऑन दि मिशन असल्यासारखा तो बंगळूरच्या गोलंदाजंवर तुटून पडत होता.
मै हू ना....
संपूर्ण डावात अतिशय संयम दाखवणाऱ्या सूर्यकुमारने विजयी चौकार मारल्यानंतर मुंबई डगआऊटच्या दिशेने मै हू ना...(मी आहे ना..काळजी कशाला...) असे केवळ हातवारे करून दाखवले, त्याची ही कृतीही समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली.
काय घडले...
मुंबईच्या डावातील १३ व्या षटकांतील अखेरचा चेंडू सूर्यकुमार यादवने कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटकडे मारला. षटक संपले असल्याने विराट चेंडू घेऊन तावातावाने सूर्यकुमारच्या जवळ गेला. सूर्यकुमारही त्याच्या नजरेला नजर देत होता. चेंडूला घाम लावणाऱ्या विराटच्या चेहऱ्यावरचा राग दिसून येत होता. तेवढ्यात नॉनस्ट्रायकरवरील कृणाल पंड्या सूर्यकुमार जवळ जाऊन त्याला बाजूला नेले होते.
# बीसीसीआय राजकारण
सामना संपल्यानंतर ‘सामन्यातला महत्त्वाचा क्षण’ या नावाखाली हा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि क्षणार्धात # बीसीसीआय राजकारण, # शेम ऑन विराट...असे ट्रेंड सुरू झाले. ‘एसकेवाय’ (सूर्यकुमार यादव) या नावाने सूर्यकुमारचे कौतुकही करण्यात येत होते. सूर्यकुमारला राष्ट्रीय संघात स्थान न देणाऱ्या निवड समितीवरही टीकास्त्र सोडण्यात आले.
रवी शास्त्रींकडून ‘सूर्यनमस्कार’
मुंबईतील खेळाडूंचे नेहमीच पाठराखण करणाऱ्या मुंबईकर आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांनी सामना संपल्यानंतर लगेचच ‘सूर्यनमस्कार’ असा उल्लेख करत हात जोडलेली ईमोजी टाकली आणि अशीच कणखरता कायम ठेवत संयमही ठेव, असा ट्विटवर उल्लेख केला. एकीकडे विराट सूर्यकुमारला खुन्नस देत असताना दुसरीकडे शास्त्री यांनी त्याचे केलेले कौतुक महत्त्वाचे ठरणार आहे.