ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली एकच कसोटी सामना खेळणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

भारतीय क्रिकेट मंडळाने विराट कोहलीची पितृत्वाची रजा मान्य केली आहे, त्यामुळे कर्णधार कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली कसोटी झाल्यावर मायदेशी परतणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवडण्यात न आलेल्या रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठी नव्याने निवडलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे, पण त्याला मर्यादित षटकांच्या लढतीसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. 

मुंबई :  भारतीय क्रिकेट मंडळाने विराट कोहलीची पितृत्वाची रजा मान्य केली आहे, त्यामुळे कर्णधार कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली कसोटी झाल्यावर मायदेशी परतणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवडण्यात न आलेल्या रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठी नव्याने निवडलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे, पण त्याला मर्यादित षटकांच्या लढतीसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. 

रोहितची कसोटी मालिकेसाठी निवड झाली असली तरी मर्यादित षटकांच्या लढतींसाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश नाही. आता यापूर्वी संघात निवडलेल्या फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियास जाऊ शकणार नाही. त्याच्याऐवजी यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजन याला निवडण्यात आले आहे. 

कोहली आणि अनुष्का शर्मा यांना त्यांच्या पहिल्या अपत्याची प्रतीक्षा नववर्षाच्या सुरुवातीस आहे. त्यामुळे कोहलीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सहभागाबाबत प्रश्‍न होता. आता २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात कोहली तीन एकदिवसीय लढती, तीन ट्‌वेंटी, तसेच ॲडलेडला प्रकाशझोतात होणारी कसोटी खेळल्यावर मायदेशी परतणार आहे. ही कसोटी १७ ते २१ डिसेंबर दरम्यान आहे. पहिल्या कसोटीनंतर भारतात परतण्याची इच्छा विराट कोहलीने व्यक्त केली होती. त्याला पितृत्वाची रजा मान्य करण्यात आली आहे, असे भारतीय मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे. 

मर्यादित षटकांच्या लढतीच्यावेळी रोहितची पुनर्वसन प्रक्रिया ऑस्ट्रेलियात होईल. हा निर्णय रोहित शर्मा आणि निवड समितीबरोबरील चर्चेनंतरच झाला आहे. रोहितच्या तंदुरुस्तीचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. तो पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठीच त्याला एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी २० मालिकेच्यावेळी ब्रेक देण्याचे ठरले आहे, असे भारतीय मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे. 

आता पत्रकात थेट उल्लेख नसला तरी रोहित अमिरातीतून अन्य खेळाडूंसहच ऑस्ट्रेलियास रवाना होणार आहे. भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये खेळलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चार्टर विमानाने सिडनीस जाणार आहेत. तिथेच भारतीय संघाचे विलगीकरण होईल. त्या कालावधीत भारतीय संघाच्या सरावास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

साहाबाबत साशंकता; पण इशांतबाबत आशा
कसोटीसाठी यष्टिरक्षक म्हणून निवडलेला वृद्धिमान साहा तंदुरुस्त नसल्याचे भारतीय मंडळाने जाहीर केले. त्याच्या बाबतीत निर्णय योग्य वेळी जाहीर होणार आहे; मात्र त्याच वेळी इशांत शर्मा तंदुरुस्त होईल आणि कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा भारतीय मंडळाने व्यक्त केली आहे. 

सुधारित भारतीय संघ 
ट्‌वेंटी २० ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक) श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

एकदिवसीय लढती ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार तसेच यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक).

कसोटी ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या