विराट कोहली म्हणाला.. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली कसोटी आम्ही फलंदाजांमुळे हरलो

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

पहिल्या दोन दिवसांत चांगले क्रिकेट खेळल्यानंतर आम्ही शेवटच्या तासाभराच्या खेळात धैर्य आणि निर्धार दाखवलाच नाही, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.

ॲडलेड : पहिल्या दोन दिवसांत चांगले क्रिकेट खेळल्यानंतर आम्ही शेवटच्या तासाभराच्या खेळात धैर्य आणि निर्धार दाखवलाच नाही, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. या दारुण अवस्थेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही तो म्हणाला.पहिल्या कसोटी सामन्यात झालेला पराभव भारतीय संघाच्या आणि खास करून विराट कोहलीच्या जिव्हारी लागला आहे. डोळ्यात पराभवाचे दु:ख लपवत त्याने नाराजी व्यक्त केली.  पहिल्या सामन्यातल्या पराभवाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. चांगली आघाडी हाती घेत आम्ही आजच्या दिवसाच्या खेळाला भिडत होतो. खूप आशा होत्या हाती आलेले वर्चस्व अजून वाढवायच्या. पण कसले काय, आम्ही साफ कोलमडून पडलो. दोन दिवस मेहनत करून आम्ही चांगली स्थिती सामन्यात मिळवली होती. आणि त्या सगळ्यावर एका तासाच्या खेळात पाणी फिरवले, असे तो म्हणाला.

सावध होतो...

कोणाला जर का असे वाटत असेल की आम्ही हाती आघाडी असल्याने आरामात होतो तर तो गैरसमज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना विश्रांतीला एक क्षणही जागा नसते. सतत दडपणाचा सामना करत सर्वोत्तम कामगिरी करायची हिंमत ठेवावी लागते, हे आम्ही सगळे पूर्णपणे जाणून आहोत, असे त्याने सांगितले. विराट पुढे म्हणतो, आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला, पण आम्ही योग्य विचारांनी फलंदाजी केली नाही. दडपण गोलंदाजांवर टाकले नाही तर मग फलंदाजी करताना धास्तावल्यासारखे होते. समोरच्या संघाला त्याची चाहूल लागली आणि त्यांनी आमच्यावर झडप घातली. जर पुनरागमन करायचे असेल तर आम्हाला सामन्याची आणि आपल्या संघाची असलेली अवस्था बघून फलंदाजी करताना आपापली योजना आखून चोख राबवावी लागेल. प्रत्येक सामन्यात समोरचा संघ अशीच टिच्चून गोलंदाजी करणार आहे, मग त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना आम्हाला उत्तरे शोधावीच लागतील.

संबंधित बातम्या