विराटला ऑस्ट्रेलियाबरोबर खुन्नस नको, स्पर्धा हवी !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

 भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर ठिणग्या उडतात, पण गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाच्या मैदानावरील वर्तणुकीबाबत फरक पडला आहे, स्पर्धा हवीच, पण अनावश्‍यक खुन्नस नको, अशी सर्वांची भावना आहे.

अ‍ॅडलेड :  भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर ठिणग्या उडतात, पण गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाच्या मैदानावरील वर्तणुकीबाबत फरक पडला आहे, स्पर्धा हवीच, पण अनावश्‍यक खुन्नस नको, अशी सर्वांची भावना आहे. सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावर भर असायला हवा. मैदानावर थोडी बोलाचाली होणारच, पण कोणी लक्ष्मणरेषा ओलांडणार नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी याच ॲडलेड ओव्हल मैदानावर मी पहिल्यांदा सहा वर्षांपूर्वी स्वीकारली. त्या सामन्यात आम्ही कडवी लढत दिली होती. मी जास्त भूतकाळात रमणारा नाही. मला वर्तमानात जगून तयारीच्या प्रक्रियेवर लक्ष देणे पसंत आहे. सहा वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे ध्येय एकच आहे...चांगले क्रिकेट खेळून सामना जिंकणे, असे विराट म्हणाला.

रहाणे आणि माझे ध्येय सारखेच

ॲडलेड कसोटी सामना खेळून मी मायदेशी परतणार आहे. मी आणि अजिंक्‍य रहाणे खूप जवळचे मित्र आहोत आणि भरपूर चांगल्या भागीदाऱ्या आम्ही एकत्र केल्या आहेत. तो एक अत्यंत गुणी खेळाडू आणि सक्षम कप्तान आहे. आमचे ध्येय एकच आहे. संघातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे. अजिंक्‍य उत्तम प्रकारे संघाला दिशा दाखवेल याची शंभर टक्के खात्री आहे, असे कोहलीने रहाणेबद्दल म्हणाला.

"ऑस्ट्रेलियन प्रेक्षक माझा आणि बुमराचा खेळ बघायला जास्त उत्सुक आहेत, कारण त्यांना मी ऑस्ट्रेलियन विचारांचा खेळाडू वाटतो, परंतु माझे व्यक्तिमत्त्व म्हणजे नवीन भारताचा आरसा आहे, जो आव्हाने स्वीकारून त्याला आत्मविश्‍वासाने धडक मारायची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवतो."
-विराट कोहली

 

 

संबंधित बातम्या