विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी करा!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

आयपीएलमध्ये बंगळूर संघाचा कर्णधार या जबाबदारीत विराट कोहलीचे योगदान काय? त्याने किती वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे बंगळूर संघाच्या कर्णधारपदावर त्याची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टीका भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता संघाला दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरने केली आहे.

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये बंगळूर संघाचा कर्णधार या जबाबदारीत विराट कोहलीचे योगदान काय? त्याने किती वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे बंगळूर संघाच्या कर्णधारपदावर त्याची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टीका भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता संघाला दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरने केली आहे.

तिखट आणि सडेतोड मत प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेला आणि टीम इंडियाच्या दोन विश्‍वविजेतेपदामध्ये सदस्य असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वावर निशाणा साधला. आयपीएलमधील यशस्वी कर्णधार म्हणून गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माबरोबर विराट कोहलीचे नाव घेतले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले. 

आयपीएलमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरलेल्या विराट कोहलीला कर्णधारपदावर दूर करायला हवे का? या प्रश्‍नावर गंभीरने १०० टक्के दूर करायला पाहिजे, आत्तापर्यंत कर्णधार म्हणून किती यश मिळवले. आठ वर्षे तो आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकला नाही. आठ वर्षे खूप होतात. आठ वर्षे सतत कर्णधार आहे आणि त्याला एकही करंडक जिंकता आलेला नाही, असा कर्णधार मला दाखवा? तरीही विराटला तुम्ही अजूनही संधी देणार? असे अनेक प्रश्‍न गंभीरने विराटच्या नेतृत्वाबाबत उपस्थित केले.  

२०१२ आणि २०१४ च्या आयपीएलमध्ये कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या गंभीरने आपण विराटवर व्यक्तीशः टीका करत नाही, पण कोठे तरी विराटने विचार करून जबाबदारी घ्यायला हवी, बंगळूरचा संघ अजूनही विजेतेपद मिळवू शकलेले नाही याला मीच जबाबदार आहे, हे विराटने मान्य करायला हवे, असे सांगताना गंभीरने आर. अश्‍विनचे उदाहरण दिले. तो पंजाबचा दोन वर्षे कर्णधार होता, परंतु संघाला काहीच यश मिळाले नाही म्हणून त्याला संघातूनच दूर करण्यात आले, असे गंभीरने सांगितले.

धोनी, रोहितचे कौतुक
रोहित शर्मा आता पाचव्या विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे. कर्णधार म्हणून तो योगदान देत असल्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदी कायम ठेवले आहे. महेंद्रसिंग धोनीबाबतही हेच म्हणता येईल, त्याने चेन्नई संघाला तीन वेळा विजेतेपदाचा मुकुट मिळवून दिलेला आहे. रोहित शर्माने जर एवढे यश मिळवले नसते तर कर्णधार म्हणून मुंबईने त्याचा विचार केला असता, असे गंभीरने सांगितले.

विराट जबाबदारी घेत नाही
गौतमने विराटच्या अपयश न स्वीकारण्याच्या मानसिकतेवरच हल्लाबोल केला. जेव्हा तुम्ही यशाचे श्रेय घेता तेव्हा टीकाही सहन करायला हवी. खरं तर सलग चार पराभवांनंतर बंगळूरचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या लायकच नव्हता. आम्ही प्लेऑफसाठी पात्र ठरलो, असे म्हणणेच चुकीचे होते. तुम्ही लायकच नव्हता, अशा शब्दांत गंभीरने टीका केली.

संबंधित बातम्या