विराटvsबाबर: पाकिस्तानी खेळाडू कोहली-बाबरच्या तुलनेवरून का भडकला?

विराटvsबाबर: पाकिस्तानी खेळाडू कोहली-बाबरच्या तुलनेवरून का भडकला?
Virat vs Babar Former Pakistan cricketer Abdul Razzaq was outraged when compared Virat Kohli to Babar

नवी दिल्ली: विराट कोहली आणि पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम यांची बरीच तुलना केली जाते. नेहमीच या दोघांची तुलना करण्याचा मुद्दा चर्चेत राहतो. बर्‍याच माजी क्रिकेटपटूंनी या दोघांबद्दल अभिप्राय दिलेला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने देखील कोहली आणि बाबर यांच्या संदर्भात वक्तव्य केले आहे. या दोघांची तुलना करणे चुकीची आहे असा दावा त्याने केला आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू रझाक म्हणतो की, पाकिस्तानात जास्त गुणवान खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्याची तुलना भारताशी करणे चुकीचे आहे. रझाक नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे वादात राहतो. त्याने जसप्रीत बुमराहला काही काळापूर्वी बेबी बॉलर म्हटले होते.

क्रिकेट पाकिस्तान नावाच्या एका चॅनलने रज्जाकला बाबर आजम आणि विराट कोहलीविषयी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे आपण कोहली-बाबरची तुलना करू नये. तुम्ही लोक पाकिस्तानी खेळाडूंची तुलना भारतीय खेळाडूंशी करू नये कारण पाकिस्तानमध्ये जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत. मागे वळून पाहिलं तर आपल्याकडे बरेच मोठे खेळाडू आहेत. आपण मोहम्मद युसुफ, इंझमाम-उल-हक, सईद अन्वर, जावेद मियांदाद, झहीर अब्बास आणि एजाज अहमद यांच्याशी तुलना करू शकतो.

विराट कोहली आणि बाबर आजम हे दोघेही वेगवेगळे खेळाडू आहेत. जर या दोघांची तुलना करायची असेल तर भारत आणि पाकिस्तान सामने असावेत. मग आपण सर्वोत्तम खेळाडू कोण हे ठरविले पाहिजे. विराट कोहली हा चांगला खेळाडू असून त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ दाखविला आहे. मी त्या विरोधात नाही, परंतु जर भारतीयांनी त्यांच्या खेळाडूंची पाकिस्तानशी तुलना केली नाही तर आपणही तसे करू नये, असे रझाक म्हणाला.

अब्दुल रझाक, बाबर आझम यांना पाठिंबा देताना ते म्हणाला, झेडटीबीएल संघात तो पाच ते सहा वर्षे माझ्या कर्णधारपदी खेळला. कर्णधार म्हणून मी त्याला कधीही संघातून काढून टाकले नाही. तो खूप हुशार होता आणि खूप चांगला फलंदाज आहे. त्याने जगासमोर स्वत: ला सिद्ध केले आहे आणि आता तो प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. जर आपण त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर तो सर्व रेकॉर्ड मोडेल असा मला विश्वास आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com