वीरधवल खाडे: सराव नव्हे, सध्या काम महत्त्वाचे

.
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

शिबिरास न जाण्याचा निर्णय माझाच; वीरधवलचे स्पष्टीकरण

मुंबई: दुबईतील सरावासाठी माझ्या वरिष्ठांनी मला परवानगी दिली होती; मात्र मीच सर्वंकष विचार करून सध्याच्या परिस्थितीत कामावर लक्ष केंद्रित करण्यास महत्त्व देण्याचे ठरवले आणि शिबिरास न जाण्याचा निर्णय घेतला, असे अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडे याने सांगितले.

कोरोनामुळे देशात तरणतलाव बंद आहेत, त्यामुळे जलतरणपटूंचे शिबिर दुबईत घेण्याचा निर्णय भारतीय महासंघाने घेतला; मात्र या सरावासाठी वीरधवलला राज्य सरकारने मंजुरी दिली नसल्याचे भारतीय जलतरण महासंघाने सांगितले आहे. संजय गांधी निराधार योजनेत तहसीलदार असलेला वीरधवल म्हणाला, दुबई सरावासाठी माझ्या वरिष्ठांनी परवानगी दिली होती, पण सध्या सरकारी यंत्रणेवर कामाचा जास्त ताण असल्याची जाणीव करून दिली होती. सध्या कार्यालयातील सर्वांवर ताण आहे. त्यांनाही समजून घ्यायला हवे. राज्य सरकारने कारकिर्दीत मला सातत्याने साह्य केले आहे. ऑलिंपिक अनिश्‍चित असताना कामास महत्त्व देणे योग्य होईल असा मी विचार केला.

शिबिरातील मी सोडून अन्य खेळाडू १८-१९ वर्षांचे आहेत. त्यांच्यासाठी सध्या जलतरण महत्त्वाचे आहे. मला खेळाबरोबर कुटुंब, कारकिर्दीचा विचार करायला हवा. मी दुबईतील सरावाबाबत वरिष्ठांशी चर्चा केली. त्यांनी मंजूरी दिली, पण त्याच वेळी किती अतिरिक्त ताण पडेल हेही सांगितले; मात्र निर्णय माझ्यावर सोपवला. त्यामुळे मी मार्गदर्शक निहार अमीन, पत्नीसह अन्य कुटुंबियांशी चर्चा केली. मी कामाकडे आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष देण्याचे ठरवले. त्यामुळे मी केवळ ऑलिंपिकचा विचार करू शकत नाही, असेही तो म्हणाला. 

संबंधित बातम्या