गोवा बॅडमिंटनसाठी ‘व्हीजन २०२०-२४’

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राज्य संघटना रविवारच्या आमसभेत सादर करणार खेळासाठी कृती योजना

पणजी:  गोवा बॅडमिंटन संघटनेने (जीबीए) अध्यक्ष नरहर ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली मागील चार वर्षांत दिमाखदार कामगिरी बजावली, तोच मुद्दा पकडून रविवारच्या (ता. १५) आमसभेत ‘व्हीजन २०२०-२४’ अंतर्गत प्रभावशाली कृती योजना सादर केली जाईल. 

जीबीएची आगामी चार वर्षांसाठी नवी व्यवस्थापकीय समिती बिनविरोध ठरली आहे. ठाकूर यांच्या अध्यक्षपदी, तसेच सचिवपदी संदीप हेबळे, खजिनदारपदी सर्फराज शेख, तसेच अन्य समितीच्या निवडीवर खांडेपार येथे होणाऱ्या आमसभेत शिक्कामोर्तब होईल. चार सदस्य वगळता, इतर सर्वांची व्यवस्थापकीय समितीत फेरनियुक्ती असेल. 

आमसभेत संघटनेचे पुढील चार वर्षांसाठी धोरण ठरविले जाईल. यासाठी संघटनेने संलग्न संस्था, खेळाडू आणि संबंधितांकडून सूचना मागविल्या आहेत. शनिवारी (ता. १५) दुपारी एक वाजेपर्यंत gbagoaonline@gmail.com या ई-मेलवर येणाऱ्या सूचना विचाराधीन असतील, असे हेबळे यांनी नमूद केले. जीबीएची व्यवस्थापकीय समितीसाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांनी केली. सर्व अर्ज ग्राह्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. रविवारच्या आमसभेस गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे वेटलिफ्टिंग असोसिएशन ऑफ गोवाचे सचिव जयेश नाईक, तर गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे महेश रिवणकर निरीक्षक या नात्याने उपस्थित राहतील. 

प्रशिक्षण शिबिरावर भर
जीबीएचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले, की ‘‘सध्याच्या महामारीने उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला स्पर्धा काही महिन्यांसाठी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत आणि त्यामुळे यावर्षी प्रशिक्षण हेच आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आम्ही नुकतेच पणजी, फोंडा, नावेली येथे नियमित प्रशिक्षण शिबिरे सुरू केली आहेत आणि अन्य केंद्रावरही सुरू करणार आहोत.’’ तनिशा क्रास्टो, अनुरा प्रभुदेसाई, लिडिया बार्रेटो, अर्जुन फळारी यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील छाप पाडली आहे, त्याची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे हेबळे यांनी नमूद केले. ‘‘गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आम्ही सर्वसमावेशक असा पायाभूत विकास कार्यक्रम आखला आहे आणि इतर महत्त्वाकांक्षी योजनाही विचाराधीन आहे, त्यांचे सादरीकरण आमसभेत होईल,’’ असे हेबळे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या