क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; वानखेडे स्टेडियम होणार पर्यटनासाठी खुले  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

मागील वर्षात संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले होते. त्यामुळे जगभरासह देशात देखील इतर गोष्टींप्रमाणे पर्यटन व्यवसायाला घरघर लागल्याचे पाहायला मिळाले आहे.

मागील वर्षात संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले होते. त्यामुळे जगभरासह देशात देखील इतर गोष्टींप्रमाणे पर्यटन व्यवसायाला घरघर लागल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी, पर्यटन व्यवसाय अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेला नाही. शिवाय भारतासह अजूनही काही देशात आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ववत झालेले नाहीत. परंतु आगामी काळात आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कमी होऊन पर्यटन पुन्हा चालू होण्याची आशा पर्यटन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकराने आगामी काळात पर्यटन क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारने नुकताच 2021-22 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने राज्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून, या द्वारे नवीन रोजगार देखील निर्माण होणार आहेत. 

आजची तारीख रेकॉर्ड बुक मास्टर ब्लास्टरसाठी खास; जाणून घ्या

देशभरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जेथे देशी पर्यटकांसह विदेशी नागरिक देखील भेटी देत असतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात ऐतिहासिक ठिकांणांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या पर्यटन ठिकाणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला असून, त्यानुसार राज्यात नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पर्यटकांचा कल निसर्गाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळेच कृषी पर्यटन सुरु करण्याचा विचार महाराष्ट्राने केलेला आहे. यासोबतच देशातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश देखील पर्यटनासाठी खुले करण्याचा विचार महाराष्ट्र सरकारने केला आहे. 

मुंबई आणि क्रिकेट यांचे समीकरण संपूर्ण देशातच नाहीतर जगात देखील परिचित आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणि वर्तमान काळात सुद्धा मुंबईने दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. सुनिल गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसकर, भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक व माजी खेळाडू रवी शास्त्री हे मुंबईच्याच मातीतून घडले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि रेकॉर्डबुक म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर, हिटमॅन रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांचे होम ग्राऊंड हे मुंबईतील वानखेडे मैदानच आहे. आणि याच मैदानावर भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे आता क्रिकेटच्या चाहत्यांसाठी वानखेडे स्टेडियम, खेळाडूंसाठीचे आतील ड्रेसिंग रूम व ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना आखण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. व याद्वारे कोणत्याही पर्यटकास वानखेडे मैदानाची सफर करता येणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना करून वानखेडे स्टेडियम पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे पर्यटन विभागाने म्हटले आहे.  

IPL2021: धोनी म्हणाला, लोभ इज कूल!      

दरम्यान, मुंबईत क्रिकेटचे तीन स्टेडियम आहेत. याशिवाय नवीन डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम नवी मुंबईत आहेत. मात्र वानखेडे स्टेडियमचे महत्व हे काही वेगळेच आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यात क्रिकेट सामन्यांसाठी तिकिटांच्या वाटपावरून वाद निर्माण झाल्यानंतर वानखेडे स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1973 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटीनंतर हा वाद अधिकच वाढला होता. यानंतर 1975 मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अंतिम सामना पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.     

संबंधित बातम्या