आय-लीग विजेतेपदाचे लक्ष्य : फर्नांडो सांतियागो व्हारेला

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

गोव्याचा चर्चिल ब्रदर्सने आगामी आय-लीग स्पर्धेसाठी नव्या प्रशिक्षकाच्या प्रशिक्षकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. स्पेनमधील ४७ वर्षीय फर्नांडो सांतियागो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आय-लीग विजेता संघ खेळेल.

पणजी:  गोव्याचा चर्चिल ब्रदर्सने आगामी आय-लीग स्पर्धेसाठी नव्या प्रशिक्षकाच्या प्रशिक्षकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. स्पेनमधील ४७ वर्षीय फर्नांडो सांतियागो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आय-लीग विजेता संघ खेळेल.

चर्चिल ब्रदर्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या व्हारेला यांनी आय-लीग स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. व्हिडिओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना, आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल व्हारेला यांनी चर्चिल आलेमाव व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. या वर्षी आय-लीगसाठी लढण्याचे आश्वासन दिले आहे.

सांतियागो व्हारेला गतमोसमात (२०१९-२०) गोकुळम केरळा एफसी संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी कोझिकोड येथील संघाने अंतिम लढती कोलकात्या मोहन बागानला धक्का देत ड्युरँड कप पटकाविला होता. त्यापूर्वी २०१८-१९ मोसमासाठी त्यांची गोकुळम केरळाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, पण दोन महिन्यांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर ते वैयक्तिक कारणास्तव पदमुक्त झाले होते. ते यूईएफए प्रो-लायसन्सधारक फुटबॉल प्रशिक्षक आहेत.

गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघ पोर्तुगालच्या बर्नार्डो तावारिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. सुरवातीच्या प्रभावी निकालानंतर स्पर्धेच्या उत्तरार्धात वार्का येथील संघाच्या कामगिरीत घसरण झाली, त्यामुळे तावारिस यांना डच्चू देण्यात आला होता. कोरोना विषाणू महामारीमुळे अर्धवट राहिलेल्या गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सने २० गुणांसह आठवा क्रमांक मिळविला होता.

आगामी मोसमासाठी चर्चिल ब्रदर्सने होंडुरासचा २९ वर्षीय आघाडीपटू क्लेविन झुनिगा याला करारबद्ध केले आहे. तो सीडी म्युनिसिपल लिमेनो या संघाकडून गतमोसमापर्यंत खेळला होता. त्याने होंडुरासचे २० व २३ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधित्व केले आहे.
 

संबंधित बातम्या