गुणवत्तेस न्याय न दिल्याच्या वेदना : महेंद्रसिंह धोनीने

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आम्ही आमच्या गुणवत्तेस यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यापासून न्याय दिला नाही. याच्या कमालीच्या वेदना होत आहेत, अशी कबुली महेंद्रसिंह धोनीने दिली. मुंबईविरुद्ध दहा विकेटनी पराजित झाल्यानंतर त्याने ही खंत व्यक्त केली.

शारजा: आम्ही आमच्या गुणवत्तेस यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यापासून न्याय दिला नाही. याच्या कमालीच्या वेदना होत आहेत, अशी कबुली महेंद्रसिंह धोनीने दिली. मुंबईविरुद्ध दहा विकेटनी पराजित झाल्यानंतर त्याने ही खंत व्यक्त केली.  मुंबईविरुद्धच्या पराभवाने चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान पुन्हा संपल्यातच जमा आहे. ‘‘या स्पर्धेत आमचे काय चुकले याचा सखोल आढावा घ्यावाच लागेल. हे वर्ष आमचे नव्हते, असेच म्हणावे लागेल. आमच्या किती विकेट जातात, हे महत्त्वाचे नाही; पण आमचे स्पर्धेतील स्थान पाहून नक्कीच कमालीच्या वेदना होतात,’’ असे महेंद्रसिंह धोनीने सांगितले. आता दुसऱ्या सामन्यापासून काय चुकले याचेच विश्‍लेषण करावे लागेल. अपयशाची शंभर कारणे देता येतील. आपण स्वतःच्या क्षमतेइतका खेळ केला का, हा एकच प्रश्न संघातील प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कागदावर आमचा संघ ताकदवान होता. या कामगिरीस आम्ही न्याय दिला. या वर्षी नक्कीच नाही, असेही धोनी म्हणाला.

गोलंदाजीत आम्हाला नशिबाची साथ लाभली नाही; पण फलंदाजीत... अंबाती रायदू जखमी झाला. अन्य फलंदाजांनी आपले दोनशे टक्के दिले नाही. क्रिकेटमध्ये प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना नशिबाची साथ नक्कीच हवी असते. प्रथम फलंदाजी ज्या सामन्यात हवी होती, तिथे नाणेफेक हरलो. आम्ही धावांचा पाठलाग केला, त्या वेळी दव नव्हते. आम्ही जेव्हा प्रथम फलंदाजी केली, त्या वेळी दव होते, अशी खंत धोनीने व्यक्त 
केली.

"फलंदाजांचे अपयश हा खेळाचा भाग असतो. प्रत्येक निकाल आपल्याच बाजूने लागणार नाही. जेव्हा जास्त वेदना होतात, त्या वेळी आपणच हसून त्या कमी करण्याची गरज असते. ते विसरून नव्याने मैदानात उतरणे महत्त्वाचे असते. आमच्या संघाने हे नक्कीच करण्याचा प्रयत्न केला. आता पुढील स्पर्धेबाबत स्पष्ट कल्पना आवश्‍यक आहे. या स्पर्धेचा लिलाव होणार का, स्पर्धा कुठे होणार, याबाबत अजून काहीच माहिती नाही."
- महेंद्रसिंह धोनी

संबंधित बातम्या