विश्लेषण: कोहली, फाफ, कार्तिक... दिग्गजांचा भरणा, तरीही RCB आयपीएल का जिंकत नाही?

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत असूनही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला अद्यापही विजेतेपद का जिंकता आला नाही, याचा घेतलेला आढावा
RCB
RCBDainik Gomantak

Why Royal Challengers Bangalore not won an IPL title?: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला गुजरात टायटन्स विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर बेंगलोरच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

विशेष म्हणजे सलग 16 व्या हंगामात बेंगलोरचे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. आयपीएलच्या इतिहासातील लोकप्रिय संघांपैकी एक म्हणून बेंगलोरचे नाव घेतले जाते. अनेकदा संघाकडून चांगली कामगिरीही होते. पण तरी बेंगलोर संघ विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयशी ठरले आहेत.

तीनदा होती विजेतेपदाची संधी

बेंगलोरने 2009, 2011 आणि 2016 या आयपीएल हंगामांमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, या तिन्ही हंगामात बेंगलोरने अंतिम सामन्यात पराभवाचा सामना केला.

याशिवाय 2009, 2010, 2011, 2015, 2016,2020, 2021, 2022 या आयपीएल हंगामांमध्येही बेंगलोरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना विजतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

बेंगलोरकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू खेळले, जसे की विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, केएल राहुल, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, शेन वॉटसन, मिचेल स्टार्क, युजवेंद्र चहल, अनिल कुंबळे, डेल स्टेन, ओएन मॉर्नग, झहिर खान, केविन पीटरसन, युजवेंद्र चहल, युवराज सिंग. पण तरी अद्यापही बेंगलोर विजेतेपदाची प्रतिक्षा करत आहेत. यामागे काय कारणे असून शकतात याचाच आढावा घेऊ...

1. मोजक्या खेळाडूंवर संघाची मदार

बेंगलोरकडून गेल्या 16 हंगामांमध्ये अनेक स्टार खेळाडू खेळले आहेत. पण संघ दरवर्षी काही विशेष खेळाडूंवरच सर्वाधिक अवलंबून राहाताना दिसला. याचे ताजे उदाहरण म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेत बेंगलोरचा संघ विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंवरच सर्वाधिक अवलंबून होता.

विराट, फाफ आणि मॅक्सवेल यांच्या व्यतिरिक्त बेंगलोरकडून कोणीही फलंदाजीची जबाबदारी घेताना दिसले नाहीत. या तिन्ही खेळाडूंनी 400 हून अधिक धावा केल्या. पण त्यांच्याव्यतिरिक्त कोणाला संपूर्ण हंगामात 150 धावाही करता आल्या नाही.

यापूर्वीही बेंगलोरचा संघ विराटबरोबर एबी डिविलियर्स, केएल राहुल, ख्रिस गेल अशा खेळाडूंवर अवलंबून राहिलेला दिसला होता.

RCB
IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2. ढेपाळलेली मिडल ऑर्डर

बेंगलोरची आत्तापर्यंतची एकूण कामगिरी पाहिली, तर बऱ्याचदा संघ वरच्या फळीवर अधिक अवलंबून राहाताना दिसला. आयपीएल 2023 देखील याला अपवाद राहिले नाही. पण जेवढी वरची फळी मजबूत आहे. तितकीच मधली फळी मात्र कमकुवत दिसली.

मधल्या फळीत नेहमीच बेंगलोरला अनुभवी खेळाडूची कमी जाणवली आहे. इतकेच नाही, तर मधल्या फळीत बेंगलोर सातत्याने बदल करतानाही दिसतात. यावेळीही बेंगलोरने मधल्या फळीत जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये बदल केले आहेत. त्यामुळे अनेकदा धावसंख्या मोठी करताना बेंगलोरला अडचणी आल्या.

3. दरवर्षी नव्याने संघबांधणी

बेंगलोरकडून मोठी समस्या त्यांच्या संघबांधणीत होते. आयपीएल 2023 स्पर्धेतही सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झालेले दिसले. तिसऱ्या क्रमांकावर जवळपास 6-7 खेळाडूंचा पर्याय वापरण्यात आला.

गोलंदाजी फळीतही सातत्याने बदल झाले. कोणत्याच खेळाडूला त्याची नक्की काय भूमिका आहे, याबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे एक स्थिर संघ नसल्याचा फटका संघाच्या कामगिरीवरही झाला. तसेच संघात समन्वयही राखला गेला नाही.

दरम्यान, बेंगलोरच्या बाबतीत पहिल्यांदाच असे झालेले नाही. गेल्या 16 हंगामात हीच समस्या बेंगलोरबाबत दिसली आहे. सातत्याने होत असलेले बदल संघासाठी डोकेदुखी ठरतात. दरवर्षी संघात मोठे बदल होताना दिसतात. त्याचमुळे प्रत्येकवर्षी नव्याने संघबांधणी करण्यापासून सुरुवात करावी लागते.

RCB
Virat Kohli Record: कोहलीचा डंका! सातवी IPL सेंच्यूरी ठोकत विक्रमांचा पाडला पाऊस, एकदा नजर टाकाच

इतकेच नाही, तर बेंगलोरला खेळाडूंच्या पूर्ण क्षमतेचा फायदा घेता आला नाही. जसे शेन वॉटसन सारख्या खेळाडूच्या अष्टपैलू कौशल्याचा वापर बेंगलोरला योग्य रितीने करता आला नाही. तोच वॉटसन चेन्नई सुपर किंग्स संघात गेल्यानंतर त्यांच्यासाठी मॅचविनर ठरला. शिमरॉन हेटमायरसारख्या खेळाडूलाही काही सामन्यातील अपयशानंतर बाहेर करण्यात आले.

सध्याच्या हंगामातील उदाहरण द्यायचे झाल्यास मायकल ब्रेसवेल. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रेसवेल ओळखला जातो. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याचमुळे मधल्या फळीत धावा करणारा एक फलंदाज आणि फिरकी गोलंदाजीसाठी एक उत्तम पर्यायाला त्यांना मुकावे लागले.

4. चेन्नई, मुंबईसारखी अंमलबजावणी करता येत नाही...

सातत्याच्या बदलांमुळेच कदाचीत संघाला त्यांची योग्य प्लेइंग इलेव्हन ठरवताना समस्या उद्भवतात. हीच गोष्ट आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नईच्या बाबतीत विरुद्ध दिसतात.

मुंबई आणि चेन्नई त्यांच्या संघात फारसे बदल करताना दिसत नाहीत. खेळाडूला काही सामन्यांमध्ये अपयश आले, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. त्याचमुळे त्यांना कोणता खेळाडू कसा खेळतो, त्याची कशी शैली आहे, याबद्दल माहिती असल्याने त्याला खेळवायचे की नाही याबद्दल जास्त स्पष्टता असते.

RCB Support Staff
RCB Support StaffDainik Gomantak

5. सपोर्ट स्टाफमध्येही बदल

बेंगलोरच्या सपोर्टस्टाफमध्येही गेल्या अनेक वर्षात अनेक बदल झाले आहेत. त्याचाही फटका संघाला बसला आहे. सातत्याने सपोर्ट स्टाफ बदलल्याने प्रत्येकवेळी वेगळ्या सपोर्टस्टाफच्या विचाराने पुढे जावे लागते. तसेच सपोर्ट स्टाफलाही संघाची ओळख करून त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्यासाठी काही वेळ जाऊन द्यावा लागतो.

6. ऑक्शनमध्ये चांगले खेळाडू गमावले

बेंगलोरने अनेकदा चांगल्या खेळाडूंना संघातून बाहेर करण्याची चूक केली आहे. ख्रिस गेल, केएल राहुल, युजवेंद्र चहल, शेन वॉटसन, क्विंटन डी कॉक, रॉबिन उथप्पा असे अनेक खेळाडूंना बेंगलोरने संघातून बाहेर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या खेळाडूंनी बेंगलोरमधून बाहेर पडल्यानंतरही दुसऱ्या संघासाठी चांगली कामिगिरी केली आहे.

चहलसारखा खेळाडू जो बेंगलोरचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याला संघातून बाहेर केले गेले. आज चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. चहल बाहेर गेल्यानंतर बेंगलोर फिरकी गोलंदाजीसाठी संघर्ष करताना दिसले.

आयपीएल भारतात खेळली जात असल्याने भारतीय खेळाडू महत्त्वाचे ठरतात. पण गेल्या १६ हंगामात बेंगलोर संघ सर्वाधिक केवळ विराट कोहली या एकाच भारतीय खेळाडूवर अवलंबून राहाताना दिसला. विराट व्यतिरिक्त बेंगलोर संघाने अन्य भारतीय खेळाडूंवर तेवढा सातत्याने विश्वास ठेवलेला दिसला नाही.

7. गोलंदाजी डोकेदुखी

बेंगलोरसाठी पहिल्या हंगामापासून गोलंदाजीची समस्या राहिली आहे. त्यांना योग्य गोलंदाजी मिश्रण गेल्या १६ हंगामात सापडलेले नाही. आयपीएल 2023 मध्येही सिराजला साथ देणारा गोलंदाज त्यांना सापडला नाही, कधी जोश हेजलवूड, कधी वेन पार्नेल, कधी हर्षल पटेल, कधी वनिंदू हसरंगा यांनी कामगिरी केली. पण एकत्रित गोलंदाजी युनिट म्हणून कामगिरी पाहायला मिळाली नाही.

क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की एखादा सामना फलंदाज जिंकवून देऊ शकतो, पण जेव्हा स्पर्धा जिंकायची असते, तेव्हा गोलंदाज महत्त्वाचे असतात. आणि याच गोष्टीत बेंगलोर अपयशी ठरलेले दिसले, बेंगलोर गोलंदाजांमध्ये फारशी गुंतवणूक करताना दिसले नाहीत. त्यांच्याकडून अनेक दिग्गज गोलंदाज खेळले, मात्र एक चांगले गोलंदाजी युनिट तयार करण्यात संघाला अपयश आले. त्याचाच फटका संघाला मोठ्या प्रमाणात बसला.

RCB
RCBDainik Gomantak

8. घरच्या परिस्थितीचा फायदा नाही

एम चिन्नास्वामी हे मैदान नेहमीच फलंदाजीला पोषक म्हणून ओळखले जाते. पण हीच गोष्ट बेंगलोरच्या विरोधातही जाताना दिसली. कारण याच मैदानावर अन्य संघही मोठी धावसंख्या उभारताना दिसले. तसेच मोठ्या धावसंख्यांचा पाठलागही सहज करता आला.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमधील इतर संघांची घरच्या मैदानावरील विजयी टक्केवारी ५० पेक्षाही जास्त आहे. तर बेंगलोरची मात्र ५० पेक्षाही कमी आहे. घरच्या मैदानावर सर्वात कमी विजयी टक्केवारी असलेला बेंगलोर संघ आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने खेळतात. त्याचमुळे बेंगलोरसाठी हीच मोठी समस्याही ठरताना दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com