रोहित तीन आठवड्यांत तंदुरुस्त?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी रोहित शर्माला दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीची गरज आहे, असे भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी भारतीय मंडळास कळवले असल्याचे वृत्त आहे. 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी रोहित शर्माला दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीची गरज आहे, असे भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी भारतीय मंडळास कळवले असल्याचे वृत्त आहे. 

पटेल यांनी भारतीय मंडळास अंतिम अहवाल पाठवण्यापूर्वी दोन तज्ज्ञ डॉक्‍टरांसह चर्चा केली होती. त्यांनी तीन आठवड्यांचा पूर्ण विश्रांतीचाच सल्ला दिला होता. भारतीय संघाच्या निवडीपूर्वी संघाचे फिजीओ प्रत्येक संभाव्य खेळाडूंचा वैद्यकीय अहवाल मंडळास सादर करतात. या अहवालाच्यावेळी रोहित ऑस्ट्रेलियातील मर्यादित षटकांच्या सुरुवातीस लढतीत खेळू शकणार नाही, पण त्यानंतर उपलब्ध होईल, असाच विचार केला जात होता.

रोहित आयपीएलमध्ये ब्रेक घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त होण्यास पसंती देईल, अशी मंडळाची अपेक्षा होती. त्यामुळेच त्याला संघास ऑस्ट्रेलियास नेण्याचाही विचार होता. मात्र मुंबई इंडियन्सने रोहितचा सराव करतानाचा व्हिडीओ प्रसारित केल्यामुळे गोंधळ निष्कारण वाढला असे मानले जात आहे. रोहित ऑस्ट्रेलियातील लढतीत अजूनही खेळू शकतो, असे भारतीय मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. 

बीसीसीआय पदाधिकारी नाराज

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील मर्यादित षटकांच्या लढतीसाठी उपलब्ध होऊ शकतो, याची कल्पना असूनही निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड केल्यामुळे भारतीय मंडळाचे काही पदाधिकारी नाराज आहेत. परदेश दौऱ्यासाठी उपकर्णधाराची निवड करण्याची परंपरा आहे. मात्र मर्यादित षटकांच्या लढतीसाठी रोहित उपलब्ध झाल्यास भारतीय मंडळाची नवी कोंडी होईल. मर्यादित षटकांच्या लढती काही दिवसांवर असताना उपकर्णधारात बदल कसा करता येईल, अशी विचारणा हे पदाधिकारी करीत आहेत.

संबंधित बातम्या