भारतातील फुटबॉलमध्ये महिला संघास प्राधान्य

किशोर पेटकर
मंगळवार, 21 जुलै 2020

क्लब परवाना निकषांतर्गत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा आग्रह

पणजी

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आता देशात महिला फुटबॉलला जास्त प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार क्लब परवाना निकषांतर्गत क्लबना महिलांचा संघही तयार ठेवावा लागेल, असे महासंघाचे सचिव कुशल दास यांनी एआयएफएफ संकेतस्थळावर नमूद केले.

देशातील क्लबसाठी महिला संघ तयार करणे परवाना निकष असला, तरी बंधनकारक नसेल. ही सुरवात आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले.  अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या युवा विकास कार्यक्रमाची सुरवात संथ झाली, पण आता वेग पकडला आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविला जातो. असेच महिला फुटबॉलमध्येही होईल आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत जास्त प्रमाणात महिला संघ उतरतील अशी आशा दास यांनी व्यक्त केली.

भारतात येत्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा रंगणार आहे. त्यानंतर २०२२ मध्ये महिलांची एएफसी आशिया कप स्पर्धाही होईल. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने देशातील महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. गतमोसमात झालेल्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेत देशातील १२ संघ सहभागी झाले होते. बंगळूर येथे झालेल्या अंतिम लढतीत मणिपूरच्या क्रिफ्सा संघाला नमवून गोकुळम केरळा संघाने विजेतेपद पटकाविले होते.

``महिला फुटबॉल हे अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे हे क्लबनी जाणले पाहिले असं मला वाटते. महासंघाकडून महिला फुटबॉलवर जास्त भर दिला जात आहे,`` असे दास यांनी सांगितले. देशातील क्लबनी महिला फुटबॉलला प्राधान्य देताना महिला लीगमध्ये संघ खेळवायला हवा असे आवाहनही त्यांनी केले.

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या