बांदोडकर मैदानावरील खेळपट्टीचे काम युद्धपातळीवर

किशोर पेटकर
शनिवार, 9 मे 2020

मागील दशकात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

पणजी : पणजी जिमखान्याशी केलेल्या सामंजस्य करारानुसार गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. २०२०-२१ मोसमात राज्यातील या ऐतिहासिक मैदानावर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळविण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

कोरोना विषाणू महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊन असल्यामुळे खेळपट्टी बांधकामासाठी लागणारे साहित्य मिळविण्यासाठी अडथळे येत आहे, तरीही पाऊस सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प जीसीएने केला आहे. पणजी जिमखाना वास्तूच्या नूतनीकरणात भाऊसाहेब बांदोडकर मैदानाचाही चेहरामोहरा बदलला असून त्यामुळे खेळपट्टीचे बांधकाम नव्याने करावे लागत आहे. नूतनीकरण कामामुळे बराच काळ या मैदानावरील क्रिकेट ठप्प आहे.

जीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेळपट्टीसाठी आवश्यक गुणवत्ता असलेली माती प्राप्त करणे आव्हानात्मक ठरले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात जीसीएच्या अन्य मैदानासाठी माती हैदराबाद येथून आणण्यात आली होती, त्याचा उपयोग आता पणजी जिमखान्याच्या बांदोडकर मैदानासाठी केला जात आहे. याशिवाय लॉकडाऊन शिथिलतेचा लाभ घेत हुबळी किंवा खानापूर येथून खेळपट्टीस योग्य माती मागविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्यावर भर आहे, कारण पावसामुळे आतापर्यंत केलेले काम वाया जाण्याची भीती आहे, तसे झाल्यास पुढील मोसमात या ठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धेतील सामने या ठिकाणी खेळविणे शक्य होणार नाही.

 

सारा खर्च जीसीएचा

जीसीएने दिलेल्या माहितीनुसार, खेळपट्टी बांधकामासाठी येणारा सारा खर्च जीसीए उचलणार आहे. कामासाठी मजूर मिळविणे कठीण ठरत आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांची मजुरीही दुप्पट वाढली आहे. तरीही मे महिनाअखेरपर्यंत खेळपट्टीचे काम पूर्ण करण्यावर भर आहे. पणजी जिमखान्याचे सदस्य नरहर (ताता) ठाकूर व जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्यावर खेळपट्टी कामाच्या समन्वयाची जबाबदारी आहे.

 

सूर्यकांत खेळपट्टीचे क्युरेटर

बीसीसीआयचे मान्यताप्राप्त सूर्यकांत नाईक हे बांदोडकर मैदानाच्या खेळपट्टीचे क्युरेटर आहेत. सूर्यकांत हे या कामातील दीर्घानुभवी आहेत. मागील दशकात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. सांगे येथील जीसीएचे मैदान, तसेच सांकवाळ येथील बिट्स पिलानी कँपस मैदानावरील खेळपट्ट्यांचे कामही सूर्यकांत यांनी निभावले आहे. पणजी जिमखान्याच्या बांदोडकर मैदान खेळपट्टीच्या कामात सूर्यकांत यांना विवेक पेडणेकर यांचे सहकार्य लाभत असल्याचे जीसीएकडून सांगण्यात आले.

 दृष्टिक्षेपात भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरील प्रथम श्रेणी क्रिकेट

- पहिला रणजी क्रिकेट सामना गोवा विरुद्ध तमिळनाडू, १९८६-८७

- अखेरचा रणजी क्रिकेट सामना : गोवा विरुद्ध हिमाचल, २००५-०६

- १९८८-८९ मोसमात तमिळनाडू विरुद्ध न्यूझीलंड प्रथम श्रेणी सामना

- दुलीप करंडक सामना : २०००-०१, दक्षिण विरुद्ध मध्य विभाग

- देवधर करंडक सामने : पूर्व विरुद्ध उत्तर विभाग (३१ जानेवारी १९९८), मध्य विरुद्ध उत्तर विभाग (९ जानेवारी २००३)

- सर्वोच्च धावसंख्या : तमिळनाडू ६ बाद ९१२ घोषित, विरुद्ध गोवा (१९८८-८९)

- नीचांकी धावसंख्या : गोवा सर्वबाद ५५, विरुद्ध हैदराबाद (१९९७-९८)

- संकलन : किशोर पेटकर

संबंधित बातम्या