
Grace Harris: शनिवारी वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत तिसरा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात डीवाय पाटील स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात युपी वॉरियर्सने एक चेंडू राखून 3 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, शेवटचे षटक नाट्यमय ठरले होते.
या सामन्यात युपीला विजयासाठी अखेरच्या षटकात 19 धावांची गरज होती. त्यावेळी हॅरि ग्रेस आणि सोफी एक्लेस्टोन फलंदाजीसाठी मैदानात होत्या, तर हे षटक गुजरातकडून ऍनाबेल सदरलँड टाकणार होती.
या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्रेसने षटकार ठोकत तिचा इरादा स्पष्ट केला. त्यानंतरचा चेंडू पंचांनी वाईड ठरवला, ज्यावर गुजरातची कर्णधार स्नेह राणाने रिव्ह्यू घेतला. मात्र तिसऱ्या पंचांनीही हा चेंडू वाईड असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा टाकण्यात आलेल्या दुसऱ्या चेंडूवर ग्रेस आणि सोफीने दुहेरी धावा काढल्या.
तिसऱ्या चेंडूवर ग्रेसने पुन्हा चौकार ठोकत युपीला विजयाच्या आणखी जवळ नेले. दरम्यान, पुन्हा एकदा वाईडचे नाट्य घडले. चौथा चेंडू पंचांनी आधी अधिकृत असल्याचे सांगितले होते. मात्र ग्रेसने रिव्ह्यूची मागणी केली, ज्यात हा चेंडू वाईड असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्यामुळे सदरलँडला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. ज्यावर हॅरिसने चौकार वसूल करत तिचे अर्धशतकही पूर्ण केले.
तसेच तिने नंतर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत युपीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या अखेरच्या षटकात तब्बल 24 धावा निघाल्या. ग्रेसने केलेल्या या फटकेबाजीनंतर तिचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून आणि क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक करण्यात आले.
विशेष म्हणजे ग्रेस आणि सोफी या दोघींची जोडी मैदानात जमली तेव्हा युपीला 26 चेंडूत 65 धावांची गरज होती. पण या दोघींनीही आक्रमक फलंदाजी करताना सामना हातातून निसटणार नाही याची काळजी घेत आठव्या विकेटसाठी नाबाद 70 धावांची भागीदारी केली.
ग्रेसने या सामन्यात 26 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. तिने 7 चौकार आणि 3 षटकार मारले, तर सोफीने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावांची नाबाद खेळी केली. त्यांच्याआधी युपीकडून तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या किरण नवगिरेनेही 53 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या तिघींच्या फटकेबाजीमुळे युपीने गुजरातचे 170 धावांचे आव्हान सहज पार केले.
ग्रेसने या सामन्यात केलेल्या फटकेबाजीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.