
Harmanpreet Kaur: भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी (12 मार्च) 10 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौरने महत्त्वाचा वाटा उचलला. दरम्यान एका क्षणी तिला जीवनदान मिळाले होते.
या सामन्यात हरमनप्रीत त्रिफळाचीत होता होता वाचली होती. झाले असे की युपी वॉरियर्सने मुंबईसमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना 11 व्या षटकात युपीची गोलंदाज अंजली सारवानी हिने एक धीम्या गतीचा चेंडू टाकला. ज्यावर हरमनप्रीत शॉट खेळायला चूकली, त्यामुळे चेंडू तिच्या मागे असलेल्या स्टम्पला लागला.
चेंडू स्टम्पला लागल्यानंतर त्यावरील लाईट्स देखील लागल्या. त्यानंतर युपीची कर्णधार आणि यष्टीरक्षक एलिसा हेलीने जल्लोषही सुरू केला होता, पण स्टम्पवरील बेल्स हलल्या नाहीत, त्यामुळे हरमनप्रीत बाद देण्यात आले नाही.
त्यावेळी हरमनप्रीत केवळ 7 धावांवर खेळत होती. तिने पुढे या जीवदानाचा फायदा घेत आक्रमक खेळ करत नाबाद अर्धशतक ठोकले. तसेच मुंबई इंडियन्सला विजय देखील मिळवून दिला.
हरमनप्रीतने नतालिया स्किव्हरबरोबर तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 106 धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने 33 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 53 धावांची खेळी केली. तसेच नतालिया स्किव्हरने 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 45 धावांची खेळी केली.
त्यापूर्वी यास्तिका भाटीयाने 27 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 42 धावांची खेळी केली होती. तर हेली मॅथ्यूजने 12 धावा केल्या. त्यामुळे मुंबईने 17.3 षटकातच 2 विकेट्स गमावत 164 धावा करत विजय मिळवला.
तत्पूर्वी युपी वॉरियर्सकडून एलिसा हेली आणि ताहलिया मॅकग्रा यांनी अर्धशतके केली. तसेच त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. हेलीने 46 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच मॅकग्राने 37 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्यामुळे युपीने 20 षटकांत 6 बाद 159 धावा करण्याच यश मिळवले होते.
मुंबईकडून सायका ईशाकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर एमिलिया केरने 2 विकेट्स आणि हेली मॅथ्यूजने 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.