गोव्यातील तीन मैदानावर यंदाची इंडियन सुपर लीग

क्रीडा प्रतिनिधी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

नोव्हेंबरपासून बंद दरवाज्याआड रंगणार स्पर्धेचा सातवा मोसम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम या वर्षी नोव्हेंबरपासून गोव्यातील तीन मैदानावर बंद दरवाज्याआड रंगणार आहे. या संबंधीची घोषणा स्पर्धा आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) संस्थापक व अध्यक्ष नीता अंबानी यांनी रविवारी केली.

दहा संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमातील सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक स्टेडियम आणि वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर खेळले जातील. कोविड-१९ महामारीमुळे देशातील ही प्रमुख फुटबॉल स्पर्धा एकाच राज्यात रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्पर्धेसाठी गोवा आणि केरळ यांच्यात चुरस होती, पण सामन्यानिमित्त केरळमध्ये प्रवास वाढणार या कारणास्तव गोव्यात स्पर्धा घेण्यास एफएसडीएलने मान्यता दिल्याचे सांगितले जाते. गोव्यातील स्पर्धेची तिन्ही मुख्य मैदाने आणि सराव मैदाने यांच्यातील अंतर, तसेच निवासाचे स्थान या दरम्यान संघांना कमी प्रमाणात प्रवास करावा लागण्याचे नियोजन आहे. प्राप्त माहितीनुसार, स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात खेळली जाईल.

प्रत्येक क्लबसाठी सराव मैदान
आयएसएल स्पर्धेनिमित्त सरावासाठी एफएसडीएल गोव्यातच प्रत्येक संघासाठी एक मैदान उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी गोव्यातच दहा मैदाने निश्चित करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. मैदानांच्या नूतनीकरणाचे काम पुढील महिनाभरात केले जाईल आणि त्यानंतर सराव मैदाने संबंधित क्लबच्या हवाली केली जातील. आयएसएल स्पर्धेमुळे गोव्यातील तिन्ही ठिकाणच्या मैदानांना नवी झळाळी प्राप्त होईल. तेथील सध्याच्या सुविधांचे नूतनीकरण होईल. 

सुरक्षित आणि निर्विघ्न आयएसएल स्पर्धेसाठी गोवा क्रीडा प्राधिकरण (एसएजी), गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) आणि राज्य प्रशासनासमवेत एफएसडीएल कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

‘गोवा फुटबॉलसाठी केंद्रबिंदू बनेल़’
गतमोसमातील आयएसएल अंतिम सामना कोविड-१९ मुळे फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बंद दरवाज्याआड १४ मार्च रोजी एटीके व चेन्नईयीन एफसी यांच्यात झाला होता. तेव्हा एटीकेने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली होती. स्पर्धेच्या सातव्या मोसमातील केंद्राची घोषणा करताना नीता अंबानी यांनी सांगितले, की ‘‘गोव्यात आयएसएलचा सातवा मोसम आणताना मला अतीव आनंद होत आहे, येथेच आम्ही गतमोसम संपविला होता. या सुंदर खेळात गोवा पुन्हा एकदा भारतातील केंद्रबिंदू बनेल.’’ यंदाच्या आयएसएल स्पर्धेत नवे बदल पाहायला मिळतील याकडे नीता अंबानी यांनी लक्ष वेधले आहे. त्यानुसार, आयएसएलला जागतिक लीगमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई सिटी एफसीत सिटी फुटबॉल ग्रुपची भागीदारी झाली आहे, तर एटीके संघाचे मोहन बागानसोबत विलिनीकरण झाले आहे, शिवाय आयएसएल ही सोशल मीडियावरील चौथी लोकप्रिय लीग बनली आहे. 

संबंधित बातम्या