आयएसएल : युवा गोलरक्षक धीरज एफसी गोवा संघात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

17 वर्षांखालील विश्वकरंडक संघातील खेळाडूशी साडेतीन वर्षांचा करार

पणजी : मणिपूरचा युवा गोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याच्याशी एफसी गोवा संघाने साडेतीन वर्षांसाठी करार केला असून वीस वर्षीय खेळाडू 2024 मोसमापर्यंत गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व करेल.

भारतात 2017 साली झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत धीरजने यजमान देशाचे सर्व साखळी सामन्यांत गोलरक्षण केले होते. याशिवाय तो 2016 साली 16 वर्षांखालील एएफसी कप स्पर्धेतही तो भारताचा प्रमुख गोलरक्षक होता. एआयएफएफ एलिट अकादमीत जडणघडण झालेला धीरज 2017-18  मोसमातील आय-लीग स्पर्धेत इंडियन ॲरोज संघातर्फे खेळला. त्याने परदेशातील क्लबसाठीही निवड चाचणी दिली आहे. स्कॉटलंडमधील मदरवेल एफसी संघाची चाचणी दिल्यानंतर त्याने बॉर्नेमाऊथ संघासोबत सरावही केला.

आयएसएल : मुंबई सिटीस हैदराबादकडून प्रतिकार अपेक्षित

आयएसएल स्पर्धेसाठी धीरजला केरळा ब्लास्टर्सने करारबद्ध केले, 2018-19 मोसमात त्याने आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले. त्यानंतर त्याने कोलकात्यातील एटीके मोहन बागानशी करार केला. आयएसएलमधील अडीच मोसमात धीरज 14 सामने खेळला व चार सामन्यांत क्लीन शीट राखली. मात्र यंदाच्या मोसमाच्या पहिल्या टप्प्यात त्याला एटीके मोहन बागानकडून एकही सामना खेळायला मिळाला नाही.

एफसी गोवाकडून ऑफर मिळाल्यानंतर आणि त्यांच्या योजनेची माहिती घेतल्यानंतर, या क्लबतर्फे खेळताना प्रगती साधण्याची संधी असल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे उत्साहित झालोय, असे धीरजने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘अजूनही मी शिकण्याच्या प्रक्रियेत आहे आणि प्रत्येक मोसमागणिक मी आणखी तरबेज होऊ शकतो याची खात्री आहे,’’ असे मणिपूरचा गोलरक्षक म्हणाला. धीरजला करारबद्ध करून एफसी गोवा युवा गुणवत्तेला संधी आणि व्यासपीठ देण्याचे धोरण पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचे संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी नमूद केले.

 

नवाझच्या जागी शक्य

आयएसएलच्या सातव्या मोसमातील पहिल्या टप्प्यात 10 सामन्यात मणिपूरच्याच महंमद नवाझ याने गोलरक्षण केले होते, तोच संघाचा मुख्य गोलरक्षक होता. एफसी गोवाने गुरुवारी रात्री जमशेदपूर एफसीला पराभूत करताना क्लीन शीट राखली. त्या लढतीत संघाच्या गोलरक्षणाचा भार नवीन कुमार याने सांभाळला. सुरेख कामगिरी करत नवीनने जमशेदपूरची आक्रमणे फोल ठरविली आणि सामनावीर पुरस्कारही पटकाविला. एफसी गोवाच्या आगामी नियोजनात धीरज याला नवाझ याची जागा मिळण्याची शक्यता आहे.
 

संबंधित बातम्या