न खेळताच यजुर्वेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाला केलं पराभूत; काय आहे कन्कशन सबस्टिट्यूट नियम? वाचा...

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

सामना हातातून निसटत असताना अचानक तूफान फॉर्मात असणाऱ्या अॅरॉन फिंचला चहलने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरला. परंतु, यजुर्वेंद्र चहल या सामन्यात खेळत नसतानाही जडेजाच्या जागी बदली खेळाडू म्हणून येत त्याने भारताला सामना जिंकून देण्यात मदत केली हे विशेष.    

भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या टी-ट्वेन्टीमध्ये 162 धावांचे लक्ष्य दिले होते. ही धावसंख्या आव्हानात्मक होती. मात्र, ऑस्ट्रेलियानेही सावध सुरूवात केली. या सामन्यात भारताला आघाडी घेणं गरजेचं होत. कारण भारताने याआधीच एकदिवसीय मालिका गमावली असल्याने टी-ट्वेन्टी मालिकेत तरी विजयी सुरूवात करण्याचे आव्हान भारतापुढे होते. सामना हातातून निसटत असताना अचानक तूफान फॉर्मात असणाऱ्या अॅरॉन फिंचला चहलने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरला. परंतु, यजुर्वेंद्र चहल या सामन्यात खेळत नसतानाही जडेजाच्या जागी बदली खेळाडू म्हणून येत त्याने भारताला सामना जिंकून देण्यात मदत केली हे विशेष.    

अंतिम अकरामध्येच नसणाऱ्या चहलने कसा जिंकवून दिला सामना? 

 सामन्याच्या 18व्या षटकात रविंद्र जडेजा फलंदाजी करताना जखमी झाला. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर लागलेल्या चेंडूमुळे त्याचे स्नायु दुखावले गेले. यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आलाच नाही. त्याच्या जागी यजुवेंद्र चहलला क्षेत्ररक्षणासाठी उतरविले. त्यानंतर संपूर्ण सामन्यातच तो मैदानात येऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले. त्याची षटके कोण पूर्ण करणार हा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला होता. मात्र, कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात आलेल्या चहलला गोलंदाजी देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले.

कारण, जडेजाला शेवटच्या षटकात फलंदाजी करताना आणखी एक चेंडू डोक्यालाही लागला होता. एखाद्या खेळाडूला अशा प्रकारची दुखापत झाल्यास त्याच्या जागी दुसरा बदली खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो. जडेजाने फलंदाजीने आपले काम पूर्ण केले होते. परंतु, त्याचे गोलंदाजीचे काम चहलने पूर्ण केले. त्याने 4 पूर्ण षटके गोलंदाजी करताना 25 धावा देऊन 3 गडीही बाद केले.  फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांसारखे महत्वपूर्ण खेळाडू त्याने बाद केले. सामन्यात संधीही न मिळू शकलेला चहल सामन्यामध्ये येऊन अचानक हिरो ठरला.  
 
काय आहे कन्कशन सबस्टिट्यूट? 

न्युझीलंडने आपल्या डोमेस्टीक क्रिकेटमध्ये सर्वप्रथम हा नियम सुरू केला. त्यानंतर 2018 मध्ये इंग्लंडनेही आपल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये या नियमाचा अवलंब केला. जुलै 2019 मध्ये आयसीसीनेही या नियमाला मान्यता दिली. 1 ऑगस्ट 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू करण्यात आला. त्यानंतर 'लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट'नुसार सामनाधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेतला जातो. 

एखाद्या खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्यावर त्याला अधिक खेळवून धोका न पत्करता त्याच्या जागी बदली खेळाडूला संघात कायम केले जाते. सामन्याचे अधिकारी 'लाईक फॉर लाईक' या निकषाच्या आधारे बदली खेळाडूला सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्यास परवानगी देतात. जसे आज जडेजा फिरकीपटू असल्याने त्याच्या जागी गोलंदाजी करण्यास आलेला चहलही फिरकीपटू असल्याने त्याला परवानगी देण्यात आली.  

 

संबंधित बातम्या