''आयपीएलच्या आगामी आवृत्तीत अर्जुन तेंडुलकरला स्वतःला सिद्ध करावे लागेल'' 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्स संघाचा ऑपरेशन्स संचालक झहीर खानने, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स संघातील प्रवेशावर भाष्य केले आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्स संघाचा ऑपरेशन्स संचालक झहीर खानने, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स संघातील प्रवेशावर भाष्य केले आहे. झहीर खानने अर्जुनबाबत बोलताना, अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या आगामी आवृत्तीत स्वत: ला सिद्ध करावे लागणार असल्याचे म्हटले आहे. आयपीएलच्या यंदाच्या चौदाव्या हंगामासाठी आज चेन्नईत लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसह नॅथन कोल्टर-नाईल, जिमी नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन आणि पियुष चावला यांच्यावर बोली लावत आपल्या संघात सामील केले. 

यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाचा ऑपरेशन्स संचालक झहीर खानने अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल मधील एंट्रीबाबत भाष्य केले. झहीर खानने आपण अर्जुन तेंडुलकर सोबत अनेकदा नेट मध्ये वेळ घालवल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्याला काही ट्रिक्स देखील सांगितल्या असल्याचे झहीर खानने म्हटले आहे. तसेच अर्जुन तेंडुलकर हा हार्डवर्किंग असून, शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक असल्याचे झहीर खानने यावेळी सांगितले. याशिवाय, सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून त्याच्यावर नेहमीच दबाव राहणार असल्याचे झहीर खान म्हणाला. मात्र हा दबाव पेलण्यासाठी संघातील वातावरण त्याला मदत करेल, असे झहीर खानने सांगितले. 

IPL 2021 Auction : 'हा' खेळाडू ठरला महागडा; तर अनकॅप खेळाडूंमध्ये...

यानंतर, संघाचे वातावरण हे अर्जुन तेंडुलकरला चांगला क्रिकेटर बनण्यास मदत होईल, असे मत झहीर खानने व्यक्त केले. तसेच आगामी स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला स्वतःला सिद्ध करावे लागणार असून, आपल्याकडे देखील काहीतरी विशेष असल्याचे दाखवावे लागणार असल्याचे झहीर खानने सांगितले. त्यानंतर नॅथन कोल्टर-नाईलच्या बाबत बोलताना, त्याच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीत समतोल राखला जाणार असल्याचे झहीर खानने नमूद केले. इतकेच नाही तर, नॅथन कोल्टर-नाईलचे संघात पुनरागमन झाल्यामुळे आपण आनंदी असल्याचे झहीर खानने सांगितले. व मागील हंगामात तो संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक होता, हे झहीर खानने अधोरेखित केले. 

याव्यतिरिक्त, अष्टपैलू जिमी नीशमला संघात घेण्यासंदर्भात बोलताना, तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू असल्याचे झहीरने सांगितले. आणि हे सर्व टायमिंगचे असल्याचे सांगत, आम्ही हे व्यवस्थित केल्याचे झहीर म्हणाला. व जिमी नीशममध्ये मोठी प्रतिभा असून, त्याला संधी देण्यात येणार असल्याचे झहीर खानने सांगितले. तसेच सर्व काही टायमिंगवर अवलंबून असल्याचे म्हणत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत झहीर खानने व्यक्त केले.        

दरम्यान, आज झालेल्या आयपीएलच्या लिलावात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर देखील बोली लावण्यात आली. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज 20 लाख होती. व मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला 20 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी करत आपल्या संघात घेतले. सचिन तेंडुलकर देखील आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता.     

संबंधित बातम्या