इंग्लंडचा डाव सावरत झॅक क्रॉवलेने झळकावले कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

झॅक क्रॉवले याने आठव्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथमच शतक झळकाविले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ४ बाद ३३२ धावा केल्या होत्या. क्रॉवले  १७१ धावांवर, बटलर ८७ धावांवर खेळत होता. त्यांनी पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

साऊदॅम्प्टन: कसोटी क्रिकेटमधील पहिलेच शतक झळकावलेल्या झॅक क्रॉवले याने जोस बटलर याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी अभेद्य द्विशतकी भागीदारी नोंदविली. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी शुकवारी यजमान इंग्लंडला सावरता आले.

क्रॉवले याने आठव्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथमच शतक झळकाविले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ४ बाद ३३२ धावा केल्या होत्या. क्रॉवले  १७१ धावांवर, बटलर ८७ धावांवर खेळत होता. त्यांनी पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. २२ वर्षीय क्रॉवले याने २६९ चेंडूंत खेळीत १९ चौकार मारले, तर बटलरने १४८ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार व २ षटकार खेचले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंड १-० फरकाने आघाडीवर आहे. दहा वर्षांत प्रथमच पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकण्याची त्यांना संधी असेल. यंदाच्या मोसमात यापूर्वी इंग्लिश संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिका २-१ फरकाने जिंकली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने संघात एक बदल करताना वेगवान गोलंदाज सॅम करन याच्याऐवजी जोफ्रा आर्चरला संधी दिली.

इंग्लंडची सुरवात खराब झाली. रॉरी बर्न्स याला शाहीन आफ्रिदी याने मासूद याच्याकरवी झेलबाद केले. नंतर डॉमनिक सिब्ले व क्रॉवली यांनी डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज यासीर शाह याने सिब्ले याला पायचीत करून ही जोडी फोडली. नंतर क्रॉवले आणि कर्णधार ज्यो रुट यांनी किल्ला लढविला, पण नसीम शाह याने रूटला रिझवान याच्याकरवी झेलबाद केल्यामुळे जोडी फुटली. त्यानंतर ऑली पोप याला यासीरने त्रिफळाचीत बाद केल्यामुळे इंग्लंडचा डाव ४ बाद १२७ असा संकटात सापडला. पाकिस्तानचे गोलंदाज सामन्यात वर्चस्व राखण्याच्या तयारीत असताना क्रॉवले याला बटलरची समर्थ साथ लाभली. चहापानाला इंग्लंडने ४ बाद १८४ धावांची मजल मारली, त्यावेळी क्रॉवले ९७ धावांवर खेळत होता. चहापानानंतर लगेच त्याने कसोटीतील आपले पहिले शतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड, पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद ३३२ (रॉरी बर्न्स ६, डॉमनिक सिब्ले २२, झॅक क्रॉवले नाबाद १७१, ज्यो रूट २९, ऑली पोप ३, जोस बटलर नाबाद ८७, शाहीन आफ्रिदी १-७१, यासीर शाह २-१०७, नसीम शाह १-६६).

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या