कुंकळ्ळी पालिकेची आर्थिक स्थिती बेताची

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कुंकळ्ळी पालिकेला हवी आहे आर्थिक सुबत्ता

अंदाज पत्रकातील ८० टक्के वेतनापोटी खर्च, वसुलीही थकीत

कुंकळ्ळी पालिकेची स्थिती नाकापेक्षा मोती जड अशी झाल्याचा आरोप आता पालिकेचे उपनगराध्यक्ष पद भूषविलेल्या एका नगरसेवकाने केला आहे. मोराईस नावाच्या या नगरसेवकाने सोशल मीडियावर केलेल्या आरोपात पालिका आर्थिक संकटातून जात असल्याचे म्हटले आहे.

कुंकळ्ळी : कुंकळ्ळी नगरपालिका आर्थिक दृष्टीने कमजोर असल्याचा दावा आता जनता नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकच करायला लागले आहेत.

यासाठी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. पालिकेच्या अशक्त नगराध्यक्षा मुळे व नगरसेवकामुळे अधिकारी आपली मनमानी चालवीत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

पालिका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या अंदाज पत्रकातील ८० टक्के निधी कर्मचारी, अधिकारी व कामगारांच्या वेतनावर खर्च होतो. पालिकेला वर्षातून तीन कोटी रुपयाचे उत्पन्न विविध करातून होते. घरपट्टी, वाणिज्य कर, सरकारी निधी व पालिकेच्या मालकीच्या दुकानातून मिळणाऱ्या भाड्याच्या रूपाने निधी प्राप्त होतो. यापैकी सुमारे अडीच कोटी रुपये वेतनापोटी खर्च होतात. मिळालेल्या माहितीप्रमाणे जमा खर्चाचा मेळ घालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पालिकेचा मोठा निधी कचरा गोळा करणे व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात खर्च होत आहे. कचरा गोळा करणे व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात पालिका स्वावलंबी बनण्याची गरज आहे. पालिकेने कचरा शुल्क लावले असले तरी शुल्क गोळा करण्यात येत नसल्यामुळे या शुल्काची मोठी रक्कम थकीत आहे.

कुंकळ्ळी नगरपालिकेत आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी नेमल्याने मोठा खर्च वेतनावरच होत आहे.
आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी नेमल्याचा आरोप आता जनताच नव्हे, नगरसेवकही करायला लागले आहेत. आर्थिक अव्यवस्थेला खोगीर भरती मोठे कारण असल्याचा आरोप होत आहे.
ज्याप्रमाणे खर्च होतो, त्याच प्रमाणे पालिकेने जर वेळोवेळी थकबाकी वसुली गांभीर्याने केली असती तर जमा खर्चाचा मेळ जमला असता.

विविध करापोटी व शुल्कापोटी पालिकेच्या तिजोरीत निधी जमा होणे गरजेचे होते. मात्र, पालिकेचे वसुली धोरण कमजोर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याने पालिका आर्थिक संकटातून जात आहे. कुंकळ्ळी पालिकेला खर्चाच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी तत्कालीन आमदार व माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी कुंकळ्ळी पालिकेच्या नावावर काही व्यावसायिक प्रकल्प उभारले होते. बाजार प्रकल्प, कुंकळ्ळी बहुउद्धेशीय सभागृह व इतर व्यावसायिक प्रकल्पातून पालिकेला मोठी अर्थप्राप्ती होत असली तरी पालिकेची आर्थिक घडी रुळावर कशी येत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

कचरा विल्हेवाट लावण्यात जो खर्च होतो, त्याची वसुली होणे गरजेचे असल्याचे एका नगरसेवकाने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कचरा शुल्क गोळा करण्याबाबत पालिका गंभीर नाही. व्यावसायिकांना कचरा शुल्क किती लावावा, यावर ठोस निर्णय न झाल्यामुळे कचरा शुल्काची थकबाकी थकीत राहिलेली आहे.

शिवाय घरपट्टीची मोठी वसुली थकीत राहिलेली आहे.
बेकायदेशीर बांधकामांबाबत पालिका गंभीर नसून पालिकेच्या नाकासमोर चालत असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याचे धाडस पालिका अधिकारऱ्यांना होत नाही. बेकायदेशीर बांधकामे वाढल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचा आरोप काही लोक करतात. पालिका प्रशासनाला शिस्त नसून कोणाचा पायपोस कोणाला नाही असे झालेले आहे याचा फटका वसुलीवर होत आहे

हरमल केंद्रावरील बारावी परीक्षेची आसन व्यवस्था​

आर्थिक संकट नाही?......

पालिका आर्थिक संकटात आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे पालिका सूत्राचे म्हणणे आहे. काही वेळा तात्पुरती आर्थिक परिस्थिती निर्माण होते, याचा अर्थ पालिकेची तिजोरी खाली म्हणणे मूर्खपणाचे असल्याचे पालिका सूत्राचे म्हणणे आहे. जे नगरसेवक पालिका संकटात असल्याचा दावा करतात त्यांनी वसुलीसाठी काय प्रयत्न केले ते आधी त्या नगरसेवकांनी जनतेला जाहीर सांगावे असे सूत्राचे म्हणणे आहे. पालिका अधिकारी व नगरसेवकांना एक वाच्यता नसून याचा फटका आम जनतेला भोगावे लागतात. कामे वेळेवर होत नाहीत. सिटीझन चार्टरचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप स्थानिक करीत आहे

 

संबंधित बातम्या