सांग्यात मजुरांना मिळाले काम

Dainik Gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020

कोविड १९ टाळेबंदीमुळे अनेक मजुर सध्या बेरोजगार झाले आहेत.त्यापैकी काही जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे.

सांगे

सांगे नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामाला सुरवात केली असून, पालिका क्षेत्रातील दहाही प्रभागातील गटारे उसपण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड १९ टाळेबंदीमुळे अनेक मजुर सध्या बेरोजगार झाले आहेत.त्यापैकी काही जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. जे मजूर कामाविना बेरोजगार होते त्यांना या कामासाठी नेमण्यात आले आहे. मजुरांना शहरातील गटारे उपासण्यासाठी म्हणून काम मिळाल्याने त्यांना रोजगार प्राप्ती झाली आहे.
शहरातील गटारात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव साचलेला होता. शहरातील श्रीसन प्लाझा इमारतीसमोरील गटारांची उसपणी केलेली माती पाहता यंदाच्या पावसात गटारे न उपसल्यास पावसाचे पाणी गटारातून न वाहता रस्त्यातून वाहण्याची शक्यता अधिक होती. गटारातून मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत होती. गतवर्षी पाऊस पडताच मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहत असे. पन्नास मीटर लांबीच्या गटारातून किमान ट्रकभर माती काढण्यात आली आहे.
सध्या बाजारात वर्दळ कमी असल्यामुळे मजुरांना काम कारण्यास संधी मिळत आहे. मात्र, काढलेली माती त्वरित उचलणे आवश्यक असून, अवेळी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने उसपलेली माती परत गटारात पडल्यास काम करून काहीच फायदा नसल्याचे बोलले जात आहे. सांगे नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामे लवकर हाताने घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

 

 

संबंधित बातम्या