भाडेकरुना बाहेर काढल्याने घरमालकास अटक - सुटका

Dainik Gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020

भाडेकरुना बाहेर काढल्याने घरमालकास अटक - सुटका

सासष्टी,

टाळेबंदीच्या काळात भाडेपट्टीवर राहणाऱ्याकडून भाडे वसूल न करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही शिरवडे - मडगाव येथे भाडेपट्टीवर राहणाऱ्या मजुरांनी भाडे न दिल्याप्रकरणी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन घराबाहेर काढल्याने मडगाव पोलिसांनी घरमालक ब्लॅज बरेटो (४०, शिरवडे) याला बुधवारी दुपारी अटक केली तर नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ही घटना घडली. ब्लॅज याच्या मालकीच्या घरात मूळ मध्यप्रदेश येथील नऊ रहिवासी राहत होते. घरमालकाने सुरवातीला त्यांना भाडे देण्यास सांगितले व भाडे न दिल्याने वीजपुरवठा खंडित करून अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना घराबाहेर काढले. घराबाहेर काढल्याने नऊही मजूर रेल्वे रुळावरून चालत आपल्या गावी निघाले होते. हे मजूर २० एप्रिल रोजी शिरवडे येथून चालत निघाले. मंगळवारी थिवी येथे रेल्वे रुळावरून चालत जात असताना, म्हापसा पोलिसांना दिसले.
म्हापसा पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पोलिसांनी सत्यस्थिती समजली. मडगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी संशयिताला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. संशयिताची जामिनावर सुटका करण्यात आली आहे तर नऊही मजुरांना निवाऱ्याची सोय केलेल्या नावेली स्टेडियमवर करण्यात आले आहे. याप्रकरणी मडगाव पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर पुढील तपास करत आहेत. 

संबंधित बातम्या