‘ऑलिंपिक बॉक्सिंग’साठी यांची झाली निवड

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

‘ऑलिंपिक बॉक्सिंग’साठी लेनी यांची नियुक्ती

गोव्यातील बॉक्सिंग खेळाचे लेनी हे संस्थापक आहेत. ते इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आहेत. डकारमधील स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग टास्क फॉर्सने त्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियात झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत रेफरी व पंच ही भूमिका त्यांची यशस्वीपणे बजावली होती.

पणजी : गोव्याचे ६६ वर्षीय लेनी गामा सध्या सेनेगलमधील डकार येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक बॉक्सिंगच्या आफ्रिका पात्रता फेरीत आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी नात्याने जबाबदारी पेलत आहेत. स्पर्धेला २० रोजी सुरवात झाली असून पात्रता फेरी २९ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

ते भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या नियम आणि तांत्रिक समितीचे प्रमुखही आहेत. ते गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष या नात्यानेही कार्यरत आहेत. डकारमधील ऑलिंपिक पात्रता स्पर्धेनंतर लेनी लंडनमधील युरोपियन बॉक्सिंग पात्रता स्पर्धेसाठी रवाना होतील. ही स्पर्धा १४ ते २४ मार्च या कालावधीत लंडनमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेत युरोपातील साडेचारशे बॉक्सर्सचा समावेश असेल.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणी बॉक्सिंगमधील पात्रता फेरी सुरू आहे. पात्रता फेरीसाठी नियुक्ती होणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे लेनी यांनी नमूद केले. गतवर्षी जागतिक स्पर्धेसाठी आणि आता ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी आपली नियुक्ती होणे हे स्वप्नवत आणि भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी प्राईस वॉटरहाऊस कूपर यांनी तयार केलेली नवी गुणांकन आणि मुल्यांकन पद्धती वापरली जात आहे, त्यामुळे अचूक आणि पक्षपाती निर्णय होत असल्याचे लेनी यांनी ऑलिंपिक बॉक्सिंग पात्रता फेरीतील अनुभवाविषयी सांगितले.

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दूरध्वनी वापरण्याची मूभा झानी. अतियश कडक आणि काटेकोर दक्षता बाळगली जाते, असे त्यांनी डकार येथून पाठविलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे. आचारसंहितेत कोणतीच शिथिलता चालत नाही, असे लेनी यांनी कळविले.
लेनी सेनेगलमधील महत्त्वाच्या स्पर्धेत सक्रिय असले, तरी गोव्यातील बॉक्सिंगकडेही लक्ष ठेवून आहेत. पेडे-म्हापसा येथे ३ ते ७ मार्च या कालावधीत अखिल गोवा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीही माहिती ते दररोज राज्य संघटना पदाधिकाऱ्यांकडून घेत आहेत.

 

 

संबंधित बातम्या