शिरोड्यात बिबट्याचा मुक्त वावर!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

शिरोडा: शेणवीवाडा शिरोडा आणि कारायमळच्या भरवस्तीत भल्या मोठ्या बिबट्याने मुक्तपणे हैदोस घातला असून या बिबट्याच्या दशहतीमुळे शिरोड्यातील नागरिकांत घबराट पसरली आहे. यासंबंधी वनखात्याकडे तक्रार नोंदवताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवाजम्यासह आज सोमवार ९ रोजी या भागात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या वावराच्या खाणाखुणा आढळल्या परंतु हाती बिबटा न लागल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले.

शिरोडा: शेणवीवाडा शिरोडा आणि कारायमळच्या भरवस्तीत भल्या मोठ्या बिबट्याने मुक्तपणे हैदोस घातला असून या बिबट्याच्या दशहतीमुळे शिरोड्यातील नागरिकांत घबराट पसरली आहे. यासंबंधी वनखात्याकडे तक्रार नोंदवताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवाजम्यासह आज सोमवार ९ रोजी या भागात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या वावराच्या खाणाखुणा आढळल्या परंतु हाती बिबटा न लागल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले.

शिरोडा पंचायत क्षेत्रातील शेणवीवाडा येथील डॉ. सखाराम गोपाळ गुडे यांच्या घराशेजारी पूर्वी न्यू इंग्लिश हायस्कूल चालायचे या इमारतीच्यामागे भालचंद्र कोरगावकर यांचे घर आहे. रविवार ८ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान कोरगावकर यांच्या घरापासून जवळजवळ दहा मीटरच्या अंतरावर बिबटा उभा असल्याचे कोरगावकर यांच्या पत्नीने पाहिले. तिने जीवाच्या आकांताने घरात धुम ठोकली. शेजाऱ्यापाजाऱ्यांना याची महिती दिली. शेणवीवाड्यावरील एका हॉटेलवरही वार्ता पोचताच ही बातमी कानोकानी सर्वत्र पसरली गेली.

स्थानिक पंचसदस्य श्रीकांत नाईक हे जवळपासच्या नागरिकांना एकत्रित करून कोरगावकर यांच्या घराकडे गेले त्याचवेळी लोकांचे बोलणे ऐकून या बिबट्याने कारायमळ येथील दुर्गम परिसरात असलेल्या मोहनदास अनंत नाईक यांच्या घराच्या मागच्या बाजूला मोर्चा वळवला. मोहनदास नाईक यांच्या घराच्या मागच्या बाजूला दाट झाडी आहे. या झाडीत हा बिबटा गायब झाला. या बिबट्याला या भागातील काही नागरिकांची मांजरे व कुत्र्यांचा फडशा पाडला. या बिबट्याचा धसका घेऊन पंचसदस्य श्रीकांत नाईक यानी शिरोडा वनखात्याची आणि फोंडा वनखात्याकडे संपर्क साधून तक्रार केली.

सोमवार ९ रोजी शिरोडा, फोंडा आणि पणजी येथून वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने शेणवीवाडा, कारामळच्या रानात फिरून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु येथील दाट वनक्षेत्रात बिबट्याने कुत्रा मांजराचा फडशा पाडून टाकलेले अवशेषाचे भाग तेवढे आढळून आले. परंतु बिबट्याचा थांगपत्ता न लागल्याने वनखात्याच्या २० अधिकारी व कर्मचाऱ्यांना हात हालवत परतावे लागले.

या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी व बिबट्याला पकडण्यासाठी या वस्तीत आणि रानात वनखात्याने सापळे रचून ठेवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पंधरा दिवसापूर्वीच येथून काही अंतरावरील वाजे येथील रानात या बिबट्याचा संचार होता. त्या‌पूर्वी जानेवारी महिन्याच्या अखेरीस बोरी सिध्दनाथ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तन्नामुळे येथील माजी सरपंच चंद्रू गावडे यांच्या घराच्या मागच्या गोठ्याकडे गावडे यांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता. या बिबट्याने गावडे यांच्या शेतीची नासधुस केली होती. त्यानंतर शिवरामगड बोरी येथील रानपट्ट्यातून पाणीवाडाच्या परिसरात या बिबट्याचा वावर होता. मध्यंतरी बायथाखोल बोरी बेतोडा परिसरात हा बिबटा राजरोसपणे फिरताना नागरिकांनी पाहिले होते.

गेले तीन महिने या बिबट्याचा उपद्रव चालू असताना वनखात्याचे अधिकारी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून वावरत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या बिबट्यापासून नागिरकांना धोका पोचण्याअगोदर काही अज्ञात शिकाऱ्यांकडून या बिबट्याची शिकार होण्याचीच दाट शक्‍यता आहे. यापूर्वी बोरी शिरोडा बेतोडा निरंकाल पंचवाडी आदी भागातील रानपट्ट्यात अज्ञात शिकारी या वायंगणी पिकाच्या दिवसात पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी रानात फासे रचून ठेवतात, त्यात रानडुकरे भेरू, ससे सारखे वन्यप्राणी अडकले तर कधी बिबटे सापडले की त्यांची हत्या करून बिबट्यांची कातडी, हाडे, दात, मांस आदी अवयव परस्पर विक्री केली जात आहे. या बिबट्यांनी माणसावर हल्ले केले, हे ऐकीवात नाही. मात्र अज्ञात इसमाकडून बिबट्याची रानडुक्कर मेरू ससे आदी प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता या भागातील वनाच्या राखणीबरोबरच वन्यप्राण्यांचीही राखण करून वन्यप्राण्यांना मुक्तपणे रहायला देणे गरजेचे आहे. या परिसरात फिरणाऱ्या आणि लोकांच्या मनात भीती पसरवणाऱ्या या बिबट्याला पकडून नेण्याची कामगिरी केली जावी, अशी पंचसदस्य श्रीकांत नाईक शिरोडाचे सरपंच अमित शिरोडकर यांची मागणी आहे.

संबंधित बातम्या