मादक पदार्थांना करूया हद्दपार

किशोर मांद्रेकर
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

पैशांच्या मागे लागलेल्यांनी नीतिमत्ता वगैरे सोडून दिली आहे. पैसा कमवायलाच हवा, पण त्यासाठी गैरमार्ग अवलंबू नयेत. अमली पदार्थ व्यवहारावर नियंत्रण आणल्याचे सरकार आणि पोलिस खात्याचे बडे अधिकारी पत्रकार परिषदा घेऊन सांगतात आणि स्वत:चीच पाठ थोपटून घेतात. अमली पदार्थ कमी झालेत असे सांगताना मागील काही वर्षांचे ठोकताळे समोर ठेवले की काम होते. पण प्रत्यक्षात ‘अंदर की बात’ वेगळी असते.

जागर : राज्यात एका बाजूने अमली पदार्थांचा अंमल वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने मंत्री मटका, जुगार कायदेशीर करायलाच हवा, अशी पोटतिडकीने मागणी करत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात मद्यावर अधिक कर लावला म्हणून पर्यटनावर परिणाम होणार आहे, असे आता काही राजकारणी आणि व्यावसायिक म्हणत आहेत.

म्हणजे दारू पिणाऱ्यांनी गोव्यात यावे, त्यांनी भरपूर दारू प्यायची असल्यास ती इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त असावी (आताही ती स्वस्त आहेच), अशी मागणी पुढे होऊ लागली आहे. सारे काही पैसे मिळवण्यासाठीच चाललेय का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा. इतके दिवस समुद्रकिनारी भागात मिळणारा अमली पदार्थ आतासा शहरी आणि ग्रामीण भागातही धुडगूस घालतोय. भलेही पोलिस ‘तसे काही नाही’ म्हणू देत. पण वास्तव तेच आहे. सिनेमांमध्येही गोव्याची ‘वेगळी ओळख’ दाखवण्याचे धाडस निर्माता, सिनेलेखक करतात. यापुढे चित्रपटाच्या चित्रिकरणाला परवानगी देण्यापूर्वी कथानक तपासण्याचा निर्णय घेतला हे चांगले झाले. पण हे फार पूर्वी व्हायला हवे होते.

गोवा म्हणजे जगभरातील लोकांचे आकर्षण. म्हणूनच अनेक कंपन्यांनी गोव्याच्या नावाचे लेबल वापरून पदार्थ लोकांच्या माथी मारण्याचे प्रयत्न करून पाहिले. ‘गोवा’ नावाच्या गुटखाला एकेकाळी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेतही त्यांनी हा प्रश्‍न चर्चेत आणला होता. आता ते मुख्यमंत्री असल्याने अशा गोष्टींना थारा देणार नाहीत. पण त्यांना सगळ्याच गोष्टींकडे बारीक लक्ष द्यायला वेळ असायला हवा. गृहखाते त्यांच्यकडे असल्याने गैरधंदे, मटका, जुगार, अमली पदार्थ व्यवहार होत असतील तर लोक त्यांच्याकडे अर्थात गृहखात्याकडेच बोट दाखवणार. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने पोलिसांनीही अगदी डोळ्यात तेल घालून दक्ष राहत कारभार केला पाहिजे. पण अमली पदार्थ सापडण्याचे काही कमी होत नसल्याने पोलिस माहिती काढण्यात कमी पडतात, असा त्यातून अर्थ निघतो.

गोव्यात अमली पदार्थ येतातच कुठून? याची खडानखडा माहिती पोलिसांना असायला हवी. विदेशी पर्यटक भाड्याच्या घरात राहतात आणि गांजाचे पीक घेतात. एवढे धारिष्ट त्यांच्यात येतेच कसे? तेसुध्दा परदेशात येऊन... आपली पोलिस यंत्रणा कोठेतरी कमी पडत आहे. पोलिसांचा अंमल राहिलेला नाही म्हणून भलतेच धाडस करायला पर्यटक धजतात. अमली पदार्थ व्यवहारात पकडलेल्या कितीजणांना शिक्षा झाली आहे आणि कितीजण निर्दोष सुटलेले आहेत, याचा तपशीलही पोलिसांनी जाहीर करायला हवा. शहरात, ग्रामीण भागात अमली पदार्थ व्यवहाराची पाळेमुळे पोचल्याने या व्यवहाराचा कणा मोडून काढायला हवा.

शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये येथे अमली पदार्थ व्यवहाराचा लवलेशही पोचू नये म्हणून विशेष दक्षता बाळगायला हवी. तसेही पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांसंबंधी जागृतीपर कार्यक्रम शिक्षण संस्थांमध्ये होतात. पण बहुतेक वेळा एकच चित्रफित पुन्हा पुन्हा दाखवण्यात येते. गोव्यातील काही प्रसंग चित्रबध्द करून त्याविषयीचे कथानक दाखवले तर त्याची भयानकता अधिक वाटेल. मादक पदार्थ हे विद्यार्थ्यांमध्ये कसे पोचतात, याची उदाहरणे दिली जातात. पण त्यातून अधिक पळवाटा शोधण्यावर गैरधंद्यातले लोक भर देतात. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवायला हवी.

अगदी सातवीत शिकणारी मुलेही काही बार आणि रेस्टॉरंटमध्ये खुलेआमपणे बर्थ डे सेलिब्रेशन करतात, खास दिवस साजरे करतात. त्यांना महागडे खाणे पिणे परवडते कसे, हा प्रश्‍नही आहेच. पण पालक आपल्या मुलांना गरजेपेक्षा जास्त पैसे का देतात, हेच समजत नाही. आपणच आपल्या मुलांना व्यसनाच्या, वाईट सवयीत ढकलून देत आहोत, हे काही पालकांना समजतच नाही. बार आणि रेस्टॉरंटवालेही अशा अज्ञानी मुलांना रोखत नाहीत. गिऱ्हाईक म्हणजे त्यांच्यासाठी मोठे सावज असते. त्यांच्यासाठी ते भविष्याचे एका अर्थाने ‘पुरूमेंत’ असते. काही भागात शाळेच्या गणवेशातही मुले बार आणि रेस्टॅरंटमध्ये गेल्याची उदाहरणे आहेत. ती अशा ठिकाणी गेल्यावर त्यांना चार शब्द ऐकवण्यात काहीच अर्थ नाही. आपणच जर मुलांना चांगले वळण लावले तर मग ती वाममार्गाकडे जाणारच नाहीत.
गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांवर गांजाच्या नशेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्या मुलाला पाहून अनेकांना वाईट वाटले, काहीजण हळहळले. पण त्याने अमली पदार्थ सेवन केले नव्हते, असा खुलासाही समोर येत आहे. त्याने अमली पदार्थ जरी घेतले नसले तरी नशा येणारे काहीतरी घेणेसुध्दा भयानकच आहे. म्हणूनच हा व्हीडिओ गांभीर्याने घ्यायला हवा. त्याने अमली पदार्थ सेवन केले की नाही हा मुद्दा अलाहिदा. पण एक मुलगा काहीतरी नशापान करतो. त्याची हालत पाहता येत नाही. असे कसे होऊ शकते, या विचाराने अनेकांना झिणझिण्या आल्या. त्या विद्यार्थ्याने अमली पदार्थ सेवन केला असे जर असेल तर गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराचे जाळे पसरले आहे, असे त्यातून सिध्द होते. पोलिस या गैरव्यवहाराचा कसा सामना करतात आणि अमली पदार्थ राज्यातून हद्दपार कधी करतील तेव्हा करतील पण आपण गप्प बसून चालणार नाही. अन्यथा सर्व समाजच बिघडून जाईल.

म्हणूनच पालकांनी फारच सतर्क राहायला हवे. आपल्या पाल्यांनी कोठेही वाहत जाऊ नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यातच आपले आणि गोव्याचे हित आहे. सत्ताधारी, राजकारण्यांनीही आपणही राज्याचे पालक आहोत म्हणून अशा प्रकारणात लक्ष घालायलाच हवे. गोवा म्हणजे अमली पदार्थांची राजधानी अशी कुप्रसिध्दी होऊ नये. गोव्यातील लोक सूज्ञ आहेत, स्वाभिमानी आहेत. सर्वांनी ठरवले तर भस्मासूररूपी अमली पदार्थ नावालाही शिल्लक राहणार नाही. भविष्यातील या महासंकटाचा सामना आतापासूनच करण्यासाठी सर्वांनी आता एकसंध होण्याची गरज आहे.

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर